शहरांवर अधिक भार
By Admin | Updated: July 11, 2014 00:56 IST2014-07-11T00:34:21+5:302014-07-11T00:56:27+5:30
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यानुसार ४५.२ टक्के लोकसंख्या नागरी भागात राहू लागली आहे.

शहरांवर अधिक भार
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर
राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यानुसार ४५.२ टक्के लोकसंख्या नागरी भागात राहू लागली आहे. त्यामुळे ३.०८ लाख चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रात पसरलेल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राचा निम्मा भार शहरांवर येऊन पडला आहे, तर खेडी ओस पडू लागली आहेत.
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१३-१४मधील माहितीच्या आधारे २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११.२४ कोटींच्या पुढे पोहोचली आहे. पण या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त २.३७ कोटी निवासी घरे आहेत. सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या ९.६९ कोटी असताना १.८८ कोटी निवासी घरे होती. देशाच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राच्या लोकसंख्येची ९.३ टक्के एवढी दाटी झाली आहे. महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येचे प्रमाण १९६०-६१मध्ये २८.२२, सन १९७०-७१मध्ये ३१.१७, सन १९८०-८१ मध्ये ३५.०३, सन १९९०-९१ मध्ये ३८.६९, सन २०००-२००१ मध्ये ४२.४३, सन २०१०-११ मध्ये ४५.२ टक्के होते. २०११ मध्ये महाराष्ट्राची ७.४ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात, तर १३.५ टक्के लोक शहरी भागात राहत होते.
राज्यातील लोकसंख्येच्या वयाची मध्यमा २७.१ वर्षे म्हणजे ५० टक्के लोकसंख्या २७ वर्षे व त्यापेक्षा कमी वयोगटातील आहे. तर भारताची वयाची मध्यमा २४.९ वर्षे आहे. जनगणना २०११ नुसार राज्यातील नि:शक्त व्यक्तींची लोकसंख्या ३० लाख म्हणजे २.६ टक्के असून मागील वर्षीच्या दुप्पट आहे़
महाराष्ट्र बनले झोपडीराष्ट्र
जनगणना २०११ नुसार राज्यातील १.१८ कोटी लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. देशातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी सर्वाधिक म्हणजे १८ टक्के लोक महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील शहरी लोकसंख्येशी झोपडपट्टी क्षेत्रामधील लोकसंख्येचे प्रमाण २३.३ टक्के आहे. २००१ मध्ये हे प्रमाण २७.३ टक्के होते. यात अनुसूचित जातीचे प्रमाण १५.७, तर जमातीचे प्रमाणे ३.१ टक्के आहे. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचा कामातील सहभागाचा दर ३८.१ टक्के आहे. झोपडपट्टीत १ हजार पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण ८७२ आहे. २००१ मध्ये हे प्रमाण ८२५ होते.