अनंत अडचणींवर यशस्वी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 00:51 IST2016-11-07T00:14:49+5:302016-11-07T00:51:04+5:30
तिसगाव : अनंत अडचणींवर मात करीत तालुक्यातील एकमेव उद्योग म्हणून वृद्धेश्वर कारखान्याने तालुक्यातील कृषी, शिक्षण, अर्थकारणाला दिशा दिली़

अनंत अडचणींवर यशस्वी मात
तिसगाव : अनंत अडचणींवर मात करीत तालुक्यातील एकमेव उद्योग म्हणून वृद्धेश्वर कारखान्याने तालुक्यातील कृषी, शिक्षण, अर्थकारणाला दिशा दिली़ विस्तारीकरण केले़ यशस्वी गाळप करुन उपपदार्थांची निर्मिती केली़ मात्र, काहीजण अपुऱ्या माहितीचा विपर्यास करीत असल्याची टीका त्यांनी केली़
वृद्धेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ रविवारी माजी आमदार राजीव राजळे, आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते गव्हाणपूजा करुन व उसाची मोळी टाकून करण्यात आला़ अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे होते़ यावेळी राष्ट्रीय साखर संघाचे सरचिटणीस नितीन पवार, सभापती संभाजी पालवे, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे, ज्येष्ठ नेते दिलीप लांडे, बापूसाहेब भोसले, बाप्पूसाहेब पाटेकर आदी उपस्थित होते़
राजळे म्हणाले, महाराष्ट्रातील ४२ कारखाने ऊस नियोजनाच्या त्रुटींमुळे बंद आहेत़ काहींनी खासगीकरणाची वाट चालली आहे़ याउलट कार्यक्षेत्रासह बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास वृद्धेश्वरने संपादीत केला आहे़ सभासद व इतर शेतकरी असा भेदभाव करुन कारखान्याने ऊस दर दिला नाही तर सर्वांना समान दर दिला़ वृद्धेश्वरने जिल्ह्यात सर्वप्रथम पंधरा टक्के दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे़ वीज निर्मितीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे़ काटकसरीने कारभार करुन ३५०० प्रतिदिन मेट्रीक टन गाळपाचा विस्तारीत प्रकल्पही उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले़ प्रास्तविक कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी केले़ सुभाष ताठे यांनी स्वागत केले़ ज्येष्ठ संचालक सुभाष अंदुरे यांनी आभार मानले़ सरव्यवस्थापक भास्करराव गोरे यांनी सूत्रसंचालन केले़