सर्वांगीण सरबराईने वाढला मतदानाचा टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST2021-01-16T04:24:48+5:302021-01-16T04:24:48+5:30
तिसगाव : व्यवसायानिमित्त व शासकीय-निमशासकीय खासगी सेवेत असलेले बाहेरील मतदार आणण्यासह त्यांच्या केलेल्या सर्वांगीण सरबराईने तिसगाव (ता.पाथर्डी) ग्रामपंचायत निवडणुकांचा ...

सर्वांगीण सरबराईने वाढला मतदानाचा टक्का
तिसगाव : व्यवसायानिमित्त व शासकीय-निमशासकीय खासगी सेवेत असलेले बाहेरील मतदार आणण्यासह त्यांच्या केलेल्या सर्वांगीण सरबराईने तिसगाव (ता.पाथर्डी) ग्रामपंचायत निवडणुकांचा मतदानाचा टक्का वाढला.
महसुलीदृष्ट्या पाथर्डीत तर विधानसभेला राहुरी मतदारसंघात असलेल्या कामत शिंगवे, मिरी, मोहोज, राघोहिवरे, मांडवे येथील निवडणुकात वरिष्ठ नेते मंडळीनी काढता पाय घेतला. त्यामुळे समर्थकांची गोची झाली. त्यामुळे त्यांना एकतर्फी खिंड लढवावी लागली. शिरापूर, सुसरे, मढी, घाटशिरस ग्रामपंचायतीत मतदानाने सरासरी ८०ची टक्केवारी ओलांडली. चितळी येथे ताठे घराण्यातील दोन पारंपरिक गट एकत्रित आले. मात्र, तिसऱ्या शक्तीचा उदय झाल्याने निवडणुकीत अखेरपर्यंत चुरस राहिली. येथे ८६ टक्के मतदान झाले. जवखेडे दुमाला येथे ८५ टक्के मतदान झाले. एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात रंगतदार ठरली. कासार पिंपळगाव येथेही दोन गटांचे नेते दिवसभर मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ऐंशीपर्यंत गेली. सुसरे येथे विद्यमान सरपंच व बहुतांश सदस्यांनी निवडणुकीत थांबण्याची भूमिका घेऊनही बिनविरोधची प्रक्रिया झाली नाही. येथे चुरशीने झालेले ८० टक्के मतदान कोणाच्या पथ्थ्यावर पडणार, यावर विजयाची समीकरणे ठरणार आहेत. बाहेरील मतदारांचे कुटुंबीय स्वतंत्ररीत्या खासगी वाहनाने आणणे. परत पोहोचविणे. त्यांची जेवणावळी, संक्रांतीच्या वाणांची सस्नेह भेट अशा सर्वांगीण सरबराईने उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली.