१६० वर्षांपासून २५ कुटुंबांना टाकले वाळीत

By Admin | Updated: October 4, 2016 00:40 IST2016-10-04T00:07:28+5:302016-10-04T00:40:29+5:30

अहमदनगर : श्रीगोंदा फॅक्टरी येथे राहणाऱ्या २५ तिरमली कुटुंबांना तब्बल १६० वर्षांपासून याच समाजातील पंचांनी वाळीत टाकले असून,

For over 160 years, 25 families have been dispersed | १६० वर्षांपासून २५ कुटुंबांना टाकले वाळीत

१६० वर्षांपासून २५ कुटुंबांना टाकले वाळीत


अहमदनगर : श्रीगोंदा फॅक्टरी येथे राहणाऱ्या २५ तिरमली कुटुंबांना तब्बल १६० वर्षांपासून याच समाजातील पंचांनी वाळीत टाकले असून, त्यांना समाजाच्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही़ वाळीत टाकल्याने या कुटुंबातील मुली आणि मुलांचे कुठे नातेही जमत नाहीत़ या कुटुंबातील कुणी लग्नसमारंभात गेले तर त्यांना तेथून हाकलून लावले जाते़ जातीतीलच पंचांनी केलेल्या या अन्यायाविरोधात न्याय मिळावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कुटुंबातील सदस्यांसह लोक अधिकार आंदोलन संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले़
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा फॅक्ट्री येथे वास्तव्यास असलेल्या २५ तिरमली कुटुंबाना जातीतून बहिष्कृत केल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ पुन्हा जातीत घेण्यासाठी दहा हजार रुपये देण्यास तयार असतांनाही या कुटुंबांना जातीत घेण्यात आले नाही़ दहा ते बारा वर्षांपूर्वी जातीबाहेर टाकलेल्या काही लोकांनी पंचांना चार ते पाच लाख रुपये दिल्यानंतर त्यांना जातीत घेण्यात आले़ याच कुटुंबातील मोकूळवाडी (ता़ राहुरी) येथे राहणाऱ्या नातेवाईकांनाही असेच वाळीत टाकण्यात आले आहे़ जातीबाहेर टाकलेल्या २५ कुटुंबातील १८ मुले व २५ मुलींचे लग्न होणे बाकी असून, या समाजातील इतर यांच्याशी सोयरिक करण्यास तयार नाहीत़ या कुटुंबातील कुणाचे निधन झाले त्या व्यक्तीचे अंत्यविधीला कुणी येत नाही़ समाजाच्या कुठल्याही सण, उत्सवात या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेतले जात नाही़ जातपंचायतीला दंड भरून देण्यास तयार असतानाही पुन्हा जातीत घेतले जात नाही़ जातपंचायतीच्या या निर्णयाचा विरोध केला तर पंच खुन करण्याची धमकी देत आहेत़ या समाजाच्या जातपंचायतीत उत्तम फुलमाळी, शेटीबा काकडे, अण्णा फुलमाळी, सुभाष फुलमाळी, तात्या आव्हाड, उत्तम फुलमाळी, गुलाब काकडे, रामा फुलमाळी हे पंच म्हणून उपस्थित राहत असतात़ यांची सखोल चौकशी करून आमच्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ लोकाधिकार आंदोलनाचे अ‍ॅड़ अरुण जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले़ यावेळी बापू ओहोळ, द्वारका पवार, सुभाष शिंदे, प्रमोद काळे आदी उपस्थित होते़
(प्रतिनिधी)

Web Title: For over 160 years, 25 families have been dispersed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.