बाराव्या वर्षीच मुली बोहल्यावर; नगरमध्ये १८४ बालविवाहाच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 11:10 IST2021-08-30T11:05:27+5:302021-08-30T11:10:02+5:30
१८४ पैकी ७० टक्के बालविवाह चाईल्ड लाईन, बालकल्याण समितीने रोखले आहेत.

बाराव्या वर्षीच मुली बोहल्यावर; नगरमध्ये १८४ बालविवाहाच्या घटना
- अरुण वाघमोडे
अहमदनगर : जिल्ह्यात दिवसेंदिवस बालविवाहांचे प्रमाण वाढत असून अवघ्या बाराव्या, तेराव्या वर्षीच माता-पिता मुलींचे लग्न लावून देत आहेत. अल्पवयात लग्न झालेल्या अनेक मुलींवर वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षीच मातृत्व लादले जात आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२० ते २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत बालविवाहाच्या तब्बल १८४ घटना समोर आल्या आहेत.
गरिबी, मुलीच्या प्रेमप्रकरणाची भीती, लॉकडाऊनमध्ये लग्नाच्या खर्चात होणारी बचत, मुलाकडील नातेवाईक लग्नाचा खर्च करण्यास तयार आहेत आदी कारणांमुळे अनेक माता-पिता अल्पवयातच मुलींचे लग्न उरकत आहेत. १८४ पैकी ७० टक्के बालविवाह चाईल्ड लाईन, बालकल्याण समितीने रोखले आहेत.
गावपातळीवरील समिती बेजबाबदार
प्रत्येक गावात बालसंरक्षण समिती कार्यरत असते. या समितीचा सरपंच अध्यक्ष, अंगणवाडी सेविका सचिव तर ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतो. गावातील बालविवाह रोखण्याची जबाबदारी या समितीची असते. प्रत्यक्षात मात्र या समितीला आपले काम आणि कायद्याची जाणीवच नाही. गावात बालविवाह झाला तरी या समितीला एकतर माहिती नसते आणि माहिती झाली तरी त्यांच्याकडून काहीच कारवाई होत नाही.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेऊन बालविवाहाबाबत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच कुठे बालविवाह होत असेल तर नागरिकांनी तत्काळ बालकल्याण समिती अथवा चाईल्ड लाईनला माहिती द्यावी, त्यांची नावे गोपनीय ठेवली
जातात.
- हनिफ शेख, अध्यक्ष बालकल्याण समिती
बहुतांशी ठिकाणी समितीकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचे दिसते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमोर हा विषय ठेवला जाणार आहे.
- वैभव देशमुख, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी