अन्यथा संत, महंत रस्त्यावर उतरतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:50+5:302021-03-16T04:20:50+5:30
तिसगाव : कोरोना लॉकडॉऊनच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन-प्रवचन वगळता सर्व काही अगदी पद्धतशीर सुरू आहे. वारकरी संप्रदाय संपविण्याचा ...

अन्यथा संत, महंत रस्त्यावर उतरतील
तिसगाव : कोरोना लॉकडॉऊनच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन-प्रवचन वगळता सर्व काही अगदी पद्धतशीर सुरू आहे. वारकरी संप्रदाय संपविण्याचा डाव कोणी आखला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित करत कीर्तन, प्रवचन कार्यक्रम बंद ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने झाल्यास संत, महंतांसह वारकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा वारकरी संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल महाराज वाळके यांनी दिला.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राध्यापकनगर येथे एकादशी प्रवचन शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
वाळके महाराज म्हणाले, कीर्तन, प्रवचन सोडून राज्यात सर्व काही व्यवस्थितपणे सुरू आहे. वारी बंद करून बारी सुरू करण्याचा निर्णय शासन घेत आहे. अशीच स्थिती यापुढे सुरू राहिली तर ज्या पद्धतीने वारकऱ्यांनी एकत्रित येऊन डाऊ कंपनी हद्दपार केली होती. त्याच पद्धतीचे जनआंदोलन भविष्यकाळात उभे करण्यासाठी संत, महंत, वारकरी आता मागेपुढे पाहणार नाहीत. कीर्तन, प्रवचनासारखे पारमार्थिक व सांप्रदायिक कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून बंद राहिल्याने राज्यात अत्याचार, गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संत विचारांची राज्यातील परंपरा गेल्या काही दिवसांपासून थांबली आहे. संस्कार चिंतन-मंथन बंद झाल्याने अनेक अघटित घटना घडत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा प्रशासनाने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
उद्धव महाराज चन्ने यांचे प्रवचन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रवींद्र बावस्कर यांच्यासह या कॉलनीतील सर्व प्राध्यापक व शिक्षक मंडळीकडून करण्यात आले होते. यावेळी पुरुषोत्तम आठरे, विष्णू महाराज शिंदे, हौसराव महाराज मगर, उद्धव महाराज सबलस, बबन महाराज भिसे, बाबासाहेब महाराज मतकर, वारे महाराज, भागवत महाराज, कल्याण महाराज शिंदे, दादा महाराज नगरकर, भवार महाराज, योगी सुदर्शन महाराज, काकासाहेब महाराज मुखेकर, वैष्णवी महाराज मुखेकर यांच्यासह सुभाषराव ताठे, डॉ. बाबासाहेब मचे, सुनील शिंगवी, शिक्षक नेते विजय अकोलकर, आदर्श शिक्षक कैलास कासार, सुधीर शेळके, मिनीनाथ शिंदे, प्रा.गोरक्षनाथ आकोलकर, प्रा. बाबासाहेब चोथे आदी उपस्थित होते.