अहमदनगर : राज्य सरकारने लोकायुक्त कायदा सक्षम करावा यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र सरकार तसे करण्यास टाळाटाळ करीत आहे. डिसेंबरपर्यंत हा कायदा न झाल्यास जानेवारीत राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
हजारे म्हणाले, केंद्रातील लोकपाल कायद्यातील तरतुदीनुसार राज्यात लोकायुक्त कायदा सक्षम करण्याची प्रक्रिया तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केली होती. मात्र, अचानकपणे ते सरकार गेले आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार आले. त्यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला. मात्र, हे सरकार लोकायुक्त कायदा सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले. सक्षम लोकायुक्त कायदा आल्यास लोकायुक्तावर सरकारचे नियंत्रण राहत नाही. पुराव्यांसह तक्रारी आल्यास मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्यासंबंधी चौकशी आणि कारवाईचे अधिकार लोकायुक्ताला प्राप्त होतात. लोकायुक्ताची निवडही सरकारच्या हाती राहत नाही. त्यामुळे सरकारकडून यासाठी टाळाटाळ केली जात असावी, असा आरोप हजारे यांनी केला आहे.