रुग्णाला २२ लाखांची भरपाई देण्याचे आदेश
By Admin | Updated: December 4, 2014 15:21 IST2014-12-04T02:44:38+5:302014-12-04T15:21:52+5:30
चुकीचे इंजेक्शन देऊन रुग्णाचा पाय गमविण्यास कारणीभूत झालेल्या डॉ. पंकज हरिभाऊ जाधव (रा. राशिन, ता. कर्जत) यांना २२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

रुग्णाला २२ लाखांची भरपाई देण्याचे आदेश
अहमदनगर : चुकीचे इंजेक्शन देऊन रुग्णाचा पाय गमविण्यास कारणीभूत झालेल्या डॉ. पंकज हरिभाऊ जाधव (रा. राशिन, ता. कर्जत) यांना २२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष एस. एम. शिंबोले यांनी दिला आहे.
कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील तात्या हौसराव गवारे यांना थंडी, तापाचा त्रास होता. गवारे हे २२ जून १९९९ रोजी डॉ. पंकज जाधव यांच्या राशिन येथील मातोश्री क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेले होते. डॉ. जाधव यांनी गवारे यांची तपासणी करून डाव्या पायाच्या खुब्यात सल्फाचे इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी गवारे यांना इंजेक्शन दिलेल्या जागेवर गाठ आली. पुणे येथे केईएम रुग्णालयात गेल्यानंतर गवारे यांना गँगरीन झाल्याने पाय खुब्यापासून काढावा लागला.
अॅलोपॅथीचे ज्ञान नाही !
गवारे यांनी जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. डॉ. जाधव यांना अॅलोपॅथीचे ज्ञान नसल्याने चुकीचे इंजेक्शन दिले गेले. त्यामुळेच गवारे यांना पाय गमवावा लागला, असा निष्कर्ष मंचाने काढला आणि दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश केले. तसेच तक्रार दाखल केल्यापासून रकमेवर १० टक्के प्रमाणे व्याज देण्याचा आदेश दिला. डॉ. जाधव यांनी या आदेशाविरुद्ध राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपील केले. मात्र राज्य तक्रार मंचाने नुकसान भरपाई म्हणून सव्याज २२ लाख रुपये देण्याचे आदेश दिले.