अहमदनगर : हुंडेकरी-मुकादमांमधील करार ग्राह्य न धरण्याचे कामगार आयुक्तांचे आदेश
By साहेबराव नरसाळे | Updated: April 28, 2023 17:02 IST2023-04-28T17:02:16+5:302023-04-28T17:02:39+5:30
रेल्वे मालधक्यावरील कामगारांची वेतन वाढ, वारई वाढून मिळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून लढा सुरू आहे.

अहमदनगर : हुंडेकरी-मुकादमांमधील करार ग्राह्य न धरण्याचे कामगार आयुक्तांचे आदेश
अहमदनगर : रेल्वे मालधक्यावरील कामगारांची वेतन वाढ, वारई वाढून मिळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून लढा सुरू आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांची मुंबईत कामगार भवनात भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी हुंडेकरी - मुकादमांमधील करारनामा ग्राह्य न धरण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांना दिले आहेत, अशी माहिती काळे यांनी दिली.
मंगळवारी कवले व मंडळाचे सचिव तुषार बोरसे यांनी आंदोलनकर्त्या कामगारांना डावलून आंदोलनाशी संबंध नसणाऱ्या मुकदमांना बेकायदेशीररित्या बैठकीसाठी बोलविल्याचा आरोप करत कामगारांनी काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौकशीची मागणी करत मुंडन आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर माथाडी मंडळ अध्यक्ष, सचिव यांच्याकडून कामगारांवर सुरू असणाऱ्या अन्यायाचा पाढाच कामगारांनी आयुक्तांसमोर वाचला. याची तात्काळ दखल घेत आयुक्तांनी इथून पुढे मुकादमांऐवजी वेतन वाढ मागणी करणाऱ्या कामगारांना बैठकांसाठी बोलवण्याच्या सूचना कवले यांना दिल्या, असे काळे म्हणाले. या शिष्टमंडळामध्ये कामगारांच्यावतीने किशोर ढवळे, सुनील नरसाळे, विजय कार्ले, जयराम आखाडे आदी सहभागी झाले होते.
काळे म्हणाले, वसुली झाली असल्याची खोटी माहिती काही प्रसार माध्यमांना कवले यांनी दिली होती. आयुक्तांनी याबाबत कवले यांची चांगलीच कान उघडणी केली असून मंडळाच्याच वेतन वाढ आदेशाची अंमलबजावणी होण्यास दोन वर्षांपासून दिरंगाई झाली असल्याबद्दल खडे बोल सुनावले आहेत. हुंडेकरी यांनी मुकदमांना हाताशी धरून संगनमत करत कामगारांना अंधारात ठेवून वेतन वाढ न करण्याचा बेकायदेशीर करारनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असा दावा काळे यांनी केला आहे.
कामगार आयुक्तांनी मागण्यांची दखल घेत यशस्वी शिष्टाई करुन कामगार हिताचे आदेश दिल्यामुळे आठ दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे अर्ध नग्न बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार प्रतिनिधी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे यांनी दिली.