शिर्डीतील विरोधक एकीच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:31+5:302021-03-07T04:19:31+5:30

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे विरोधक एकीकडे आंदोलने करतानाच, दुसरीकडे विरोधकांच्या एकीची मोट ...

Opposition in Shirdi prepares for unity | शिर्डीतील विरोधक एकीच्या तयारीत

शिर्डीतील विरोधक एकीच्या तयारीत

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे विरोधक एकीकडे आंदोलने करतानाच, दुसरीकडे विरोधकांच्या एकीची मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. याचाच भाग म्हणून शिर्डीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची भेट घेऊन चर्चा केली. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरच समन्वय चर्चा घडवून आणणार असल्याची ग्वाही सत्यजीत तांबे यांनी दिल्याचे राष्ट्रवादीचे नीलेश कोते यांनी सांगितले. या शिष्टमंडळात शिवसेनेकडून कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, राहुल गोंदकर, राष्ट्रवादीकडून नीलेश कोते, अमित शेळके, अनिल पवार तर काँग्रेसकडून सचिन चौगुले, दिलीप कोते, प्रसाद शेळके, रवी कोते उपस्थित होते.

नुकतेच शिवसेनेने नगरपंचायतने कर कमी करावे. भक्तांकडून टोल वसुलीचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनाला पाठिंबा देत, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी हजेरी लावली होती. अनेक निवेदनांवरही या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावे एकत्रित दिसू लागली आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीची अघोषित युती आहेच, आता काँग्रेसलाही बरोबर घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्यात भाजपला रोखण्यासाठी तिन्ही पक्षांचा महाआघाडीचा उतारा परिणामकारक ठरला. त्यामुळे हा फॉर्म्युला गाव पातळीवरही राबविला जाऊ शकतो.

..................

शिर्डीत आहे भाजपची सत्ता

शिर्डीत सध्या विखे पाटलांच्या माध्यमातून भाजपाची एकहाती सत्ता आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्ष बदलामुळे काँग्रेसच्या हाती असलेली शिर्डी नगरपंचायतची सत्ता एका क्षणात भाजपाच्या ताब्यात गेली आहे. सध्या नगरपंचायतमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख अनिता जगताप यांच्या रूपाने शिवसेनेचा एकमेव सदस्य आहे.

Web Title: Opposition in Shirdi prepares for unity