विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद का?
By Admin | Updated: September 20, 2015 00:50 IST2015-09-20T00:41:25+5:302015-09-20T00:50:25+5:30
विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचे तोंड कोणी बंद केले? याबाबत ते का गप्प आहेत? असा सवाल माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला.

विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद का?
श्रीरामपूर : समन्यायी पाणी वाटप कायदा होत असताना मंत्रिमंडळात असूनही त्याविषयी गप्प बसणारे व आता स्वत:च्या मतदार संघावर तसेच अहमदनगर जिल्ह्णावर जलसंपदा विभागाच्या गोदावरी खोऱ्याच्या जलआराखड्याने जलसंकट आले असताना विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचे तोंड कोणी बंद केले? याबाबत ते का गप्प आहेत? असा सवाल माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला.
अशोक सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. ‘२००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा होताना श्रीरामपूरचे तत्कालिन आमदार जयंत ससाणे यांनी विधानसभेत झोपा काढल्या. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यामुळे श्रीरामपूरचे ब्लॉकचे व शेती महामंडळाचे पाणी वरच्या भागाने पळविले. अगोदर झोपा काढणारे ससाणे, कांबळे आता जलआराखड्याबाबत हरकती घेण्याचे आवाहन करीत आहेत. गेल्या १५ वर्षातील त्यांच्या दळभद्री नेतृत्वामुळे श्रीरामपूर तालुक्याचे हक्काचे पाणी जायकवाडीत जाऊन तालुक्याचे वाळवंटे बनले आहे. ससाणे-कांबळेंमध्ये दम असेल तर त्यांनी हा कायदा रद्द करून दाखवावा’ असे आव्हान देऊन मुरकुटे म्हणाले.
आमदाराचा निधी कुठे जातो? याचा जाब जनतेने आमदार, खासदारांना विचारला पाहिजे. इतर कारखान्याच्या शिक्षण व अन्य संस्था तेथील पुढाऱ्यांनी खाजगी मालकीच्या केल्या असल्या तरी अशोक कारखान्याशी सर्व संलग्न संस्था कारखाना सभासदांच्या मालकीच्या आहेत. जास्त भाव दिला म्हणून संगमनेर, प्रवरा कारखान्याच्या अभिनंदनाचे फलक लावणाऱ्यांनी आता ‘अशोक’च्या अभिनंदनाचा फलक लावायची दानत दाखविली नाही. दोन कारखाने दरवर्षी इकडून तिकडून कच्चा ऊस गाळूनही १२ टक्के साखर उतारा कसा घेतात? याचा शेतकरी संघटनेने अभ्यास करावा, असा सल्लाही मुरकुटे यांनी दिला.
प्रतापराव भोसले, जितेंद्र भोसले, बाळासाहेब पटारे, गोरख ताके, दत्तात्रय जगताप, मच्छिंद्र येळे, विठ्ठल राऊत, नामदेव बडाख, अॅड. भणगे यांनी विविध सूचना केल्या. काही सभासदांना ऊस उत्पादकता पुरस्काराने गौरविण्यात आले. सुरेश गलांडे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष गोरक्षनाथ पारखे, के. वाय. बनकर, जि.प. सभापती शरद नवले, इंद्रनाथ थोरात, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, सिद्धार्थ मुरकुटे, अर्चना पानसरे, सुनीता गायकवाड, माजी नगरसेवक सलीम शेख, महंमद शेख, विजय शिंदे, गणेश राठी आदी हजर होते. (प्रतिनिधी)