सर्वसाधारण सभेवरून विरोधक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:06+5:302021-06-04T04:17:06+5:30
प्रशासनाच्या नियोजनानुसार १४ जूनला सर्वसाधारण सभा होणार आहे. जिल्हा परिषद अधिनियमानुसार दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे ...

सर्वसाधारण सभेवरून विरोधक आक्रमक
प्रशासनाच्या नियोजनानुसार १४ जूनला सर्वसाधारण सभा होणार आहे. जिल्हा परिषद अधिनियमानुसार दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. या नियमानुसार येत्या २४ जूनला मागील सर्वसाधारण सभेचा तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होणार होता. दुसरीकडे नगरसह राज्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीत सुधारणा होत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता अथवा मोठी सवलत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे १५ जूननंतर ही सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात घेता आली असती, असा आक्षेप विरोधी सदस्यांनी घेतला आहे. सत्ताधारी पदाधिकारी आणि प्रशासन यांनी जाणीवपूर्वक ही सभा प्रत्यक्षात न घेता ऑनलाइन घेतल्याचा आरोप विरोधी सदस्य करत आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन होत असल्याने अनेक सदस्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलण्याची संधी मिळालेली नाही. यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासन विरोधकांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी जाणीवपूर्वक सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेत असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री, महसूल अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी बैठका घेत असून, या बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी आणि कार्यकर्ते हजर राहतात. त्या ठिकाणी कोरोना संसर्गाची भीती नाही का? असा सवाल उपस्थित करत ही सर्वसाधारण सभा लॉकडाऊन उघडल्यानंतर ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, ज्येष्ठ सदस्य राजेश परजणे, शरद नवले, हर्षदाताई काकडे आदींनी केली आहे.
--------------
१५ जूननंतर राज्यात लॉकडाऊन उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा १५ नंतर घेतली तर ऑफलाइन घेता येईल. सदस्यांना अनेक मुद्दे मांडायचे आहेत, परंतु सत्ताधारी त्याला घाबरत असून, त्यांनी मुद्दाम १४ जूनला ऑनलाइन सभा ठेवली आहे.
- जालिंदर वाकचौरे, गटनेते भाजप
--------------
गेल्या एक-दीड वर्षांपासून सर्वसाधारण सभा ऑनलाइनच होत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत नाही. प्रशासनाने लॉकडाऊन उघडल्यानंतर ही सभा प्रत्यक्ष सभागृहात सर्व सदस्यांच्या उपस्थित घ्यावी.
- राजेश परजणे, जि. प. सदस्य