कृषी धोरणाला विरोध हा फक्त दिखाऊपणा; राधाकृष्ण विखे यांची राज्य सरकारवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 14:20 IST2020-09-26T14:19:33+5:302020-09-26T14:20:01+5:30
केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देतात आणि काँग्रेस विरोध करतेय. महाविकास आघाडी सरकारचा कृषी धोरणाच्या विरोधातील आरडाओरडा हा फक्त दिखावूपणा असल्याची टीका माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

कृषी धोरणाला विरोध हा फक्त दिखाऊपणा; राधाकृष्ण विखे यांची राज्य सरकारवर टीका
लोणी : नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देतात आणि काँग्रेस विरोध करतेय. महाविकास आघाडी सरकारचा कृषी धोरणाच्या विरोधातील आरडाओरडा हा फक्त दिखावूपणा असल्याची टीका माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
प्रवरा सहकारी बँकेच्या कोल्हार (ता.राहाता) येथील स्थलांतरीत झालेल्या शाखेचे उद्घाटन शनिवारी आ.विखे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विखे बोलत होते.
आधी दुष्काळाने आणि नंतर करोनामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. यापूर्वीच राज्य सरकारने मदत जाहीर करायला हवी होती. पण सरकारचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांसमोर अर्थिक परिस्थितीचे आव्हान मोठे आहे. अशाही कार्यकाळात प्रवरा सहकारी बँकेने १ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे पूर्ण केलेले उद्दीष्ट ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानातून प्रत्येक घटकांसाठी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या योजनेचा लाभ प्रत्येक क्षेत्रातील घटकांना होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. कर्जाचे व्याज माफ करताना बँकानाही होणा-या आर्थिक तोट्याचा विचार करून केंद्र सरकार दिलासादायक निर्णयाचा मार्ग काढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.