अकोल्यात अवघा एकच बिबट्या!
By Admin | Updated: May 24, 2016 23:41 IST2016-05-24T23:26:32+5:302016-05-24T23:41:55+5:30
अकोले : कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारदरा परिक्षेत्रात केवळ एक बिबट्या असल्याची नोंद वन्यप्राण्यांच्या शिरगणतीत झाली

अकोल्यात अवघा एकच बिबट्या!
अकोले : कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारदरा परिक्षेत्रात केवळ एक बिबट्या असल्याची नोंद वन्यप्राण्यांच्या शिरगणतीत झाली असून अकोले वनपरिक्षेत्रात गणना करण्यासाठी निवडलेल्या पाण्याठ्यावर एकही बिबट्या आढळला नाही. मग तालुक्यातील बिबटे गेले कुठे? हा प्रश्न वन्यप्रेमींना पडला आहे.
दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात जंगल पाणवठ्यांवर निरीक्षण मनोरे तयार करून वन विभागाकडून वन्यप्राण्यांची शिरगणना केली जाते. यावर्षीही अकोले वन विभागाच्या वन कर्मचाऱ्यांनी वन्यजीवांची गणना केली. तरस, मोर, लांडोर आदी प्राणी दिसले, मात्र एकही बिबट्या पाणवठ्याकडे फिरकला नाही, असे वन परिक्षेत्रपाल आर. के. सगभोर यांनी स्पष्ट केले. प्रवरा, मुळा खोऱ्यातील ऊस तोडणी झाल्याने बिबट्यांचे लपण क्षेत्र कमी झाले आहे. म्हणून बिबट्यांनी भक्ष्य शोधार्थ पूर्वकडे आगेकूच केली असून त्यामुळे अकोले परिसरात बिबट्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. गत दोन-चार वर्षांपूर्र्वी अकोले तालुक्यात शंभरहून अधिक बिबटे असल्याचे सांगितले जात होते. यंदा शिरगणना करतेवेळी पाणवठ्यांवर एकही बिबट्या दिसला नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
अकोले वन विभाग-२, राजूर परिक्षेत्र व हरिश्चंगड कळसूबाई अभयारण्य वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांची शिरगणना माहिती संबंधीत कार्यालयात अद्याप उपलब्ध झालेली नाही. कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य भंडारदरा परिक्षेत्रात सहा ठिकाणी मचान उभारुन वन्यजीव मोजण्यात आले. घाटघर येथील घाटनदेवी, सामद्र येथील सांदणदरी, रतनवाडी येथील गपपती तळे, पांजरे येथील गुजरमाळी, उडदावणे येथील पैजाचीमाळी, पेंडशेत येथील पिंपरीचा पाणवठा अशा सहा ठिकाणी गणना करण्यात आली. यात केवळ एका बिबट्याची नोंद झाली. भंडारदरा वन्यजीवचे वनपरिक्षेत्रपाल पी. टी. पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान, अन्य चार वनपरिक्षेत्रातील माहिती अद्याप कार्यालयात उपलब्ध झाली नाही.
(तालुका प्रतिनिधी)