अहमदनगर : महापौर रोहिणी शेंडगे यांनी बोलविलेल्या महिला नगरसेविकांच्या बैठकीला केवळ आठच महिला नगरसेविकांची उपस्थिती होती. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या महिला नगरसेविकांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. काँग्रेसच्या पाचपैकी दोन नगरसेविकांनी मात्र बैठकीला हजेरी लावत आपल्या भागातील प्रश्न महापौरांपुुढे मांडले.
महापौरांनी पदभार घेतल्यानंतर महापालिकेत मंगळवारी पहिलीच बैठक बोलावली होती. या बैठकीला नगरसेवक असलेल्या महिलांनीच उपस्थित राहावे, असा फतवाच शेंडगे यांनी काढला होता. त्यानुसार, या बैठकीला शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णाताई गेणाप्पा, पुष्पा बोरुडे, मंगल लोखंडे, शांताबाई शिंदे, सुनिता कोतकर, कमल सप्रे, तर काँग्रेसच्या नगरसेविका संध्या पवार, रूपाली वारे बैठकीला उपस्थित होत्या. सुरेखा कदम, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, रीता भाकरे यांच्यासह राष्ट्रावादी, भाजप, काँग्रेसच्या तीन नगरसेविकांनी या बैठकीकडे पाठ फिरविली.
या बैठकीमध्ये शहरातील साफ सफाईबाबत कचरा वाहतुकीसाठी सर्व वाहने व्यवस्थित आहेत का, याची माहिती महापौरांनी या बैठकीत घेतली. शिवाजीनगर भागामध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या भागात तीन ते चार दिवसांमध्ये पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. बांधकाम विभागाचे जवळपास १२५ कामांच्या निविदा प्रक्रियेमध्ये आहेत. ही प्रक्रिया येत्या आठवड्यामध्ये पूर्ण होईल. स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांना प्रभागामध्ये फिरण्यास सांगून साफसफाई केल्यानंतर नोंदवहीवर नागरिकांची स्वाक्षरी घेण्याबाबत महापौर शेंडगे यांनी सूचना दिल्या. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे औषध फवारणी करणे, फॉगिंग मशीन चांगल्या ठेवणे, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
शहर व उपनगरातील रस्त्याची पॅचिंग करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. विद्युत विभागाकडून एलईडी लाइट नवीन बसविण्याचा पोल सर्व्हे सुरू आहे. आतापर्यंत सात हजार पोलचा सर्व्हे झाला आहे. प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येक सदस्यांना दुरुस्तीसाठी साहित्य देण्यात येईल. पाणीपुरवठा विभागाकडून अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना, भुयारी गटर योजना या कामाची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. यावेळी सर्व कामे पूर्ण करण्याबाबत महापौरांनी सूचना दिल्या.
--
नवजात बालकांसाठी उपचार सुविधांत अडचणी
कै.बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील सद्यस्थितीची माहिती आरोग्याधिकारी डॉ.सतीश राजूरकर यांनी बैठकीत सादर केली. सध्या ४० ते ५० महिला रुग्ण दाखल आहेत. लहान मुलांना दाखल करून घेता येते, परंतु ऑपरेशन थिएटर नसल्यामुळे मुलांना उपचारासाठी इतरत्र हलवावे लागते. इमारत फार जुनी झाली आहे. या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्तावही तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला महापालिकेतील सर्व विभागांतील अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते उपस्थित होते. या बैठकीत महिला नगरसेविकांनीही आपापल्या भागातील प्रश्न मांडले.
-------
फोटो- ०६महापालिका
महापौर रोहिणी शेंडगे यांनी मंगळवारी महापालिकेत पहिली बैठक घेतली. या बैठकीला महिला नगरसेविका आणि अधिकारी उपस्थित होते.