कांदा बियाणांचा निर्देशांक वधारला
By Admin | Updated: June 16, 2014 00:09 IST2014-06-15T23:35:16+5:302014-06-16T00:09:04+5:30
श्रीगोंदा : पाऊस नसल्याने शेती ओस पडली, मात्र बाजारपेठेत कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाली आहे. कांदा बियाणांचा निर्देशांक वाढला आहे.
कांदा बियाणांचा निर्देशांक वधारला
श्रीगोंदा : पाऊस नसल्याने शेती ओस पडली, मात्र बाजारपेठेत कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाली आहे. कांदा बियाणांचा निर्देशांक वाढला आहे. कांदा बियाणांचा तीन किलोच्या एका पायलीचा भाव दहा ते बारा हजारावर धडकला आहे.
आठवडाभरात पावसाचे आगमन झाल्यास कांदा बियाणाची एक पायली पंधरा हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा बियाणे उत्पादक शेतकरी मालामाल होतील.
कांदा सडला
गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. फेब्रुवारी, मार्च महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे कांद्याचे गोट खराब झाले आणि लागवड झालेला कांदा मोठ्या प्रमाणावर शेतातच सडला. दुसरीकडे कांद्याचे भाव कोसळले. त्यामुळे कांदा उत्पादकांना कांद्याने रडविले आहे. पाऊस नसताना रोपे तयार करण्यासाठी कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. मात्र बाजारपेठेतून कांदा बियाणे गायब झाली आहेत.
मराठवाड्याकडे धाव !
कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांकडे धाव घेतली आहे. नाशिक, जुन्नर भागातून कांदा बियाणे वाढीव भावाने खरेदी केली जात आहेत. (तालुका प्रतिनिधी)
अन्यथा फसवणूक
गेल्या वर्षी जादा पाऊस झाला. त्यामुळे कांदा बियाणे खराब झाले. त्यामुळे उत्पादन कमी निघाले. आता कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कांदा बियाणे खरेदी करताना पक्की बिले घ्यावीत. शेतकऱ्यांकडील बियाणे विश्वासावरच खरेदी करावी अन्यथा फसवणूक होऊ शकते.
विश्वासराव दारकुंडे,
कृषी अधिकारी, श्रीगोंदा