कांद्याने रडविला शेतकरी : बारा गोण्यांचे मिळाले अवघे पन्नास रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:53 IST2018-11-28T16:51:34+5:302018-11-28T16:53:47+5:30
संगमेनरच्या बाजार समितीत १२ गोणी कांदा (६५३ किलो) विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ५० रूपये मिळाले.

कांद्याने रडविला शेतकरी : बारा गोण्यांचे मिळाले अवघे पन्नास रुपये!
घारगाव : संगमेनरच्या बाजार समितीत १२ गोणी कांदा (६५३ किलो) विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ५० रूपये मिळाले. ऐन दुष्काळात मोठ्या कष्टातून पिकवलेल्या कांद्याला असा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
संगमनेरच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील चंद्रकांत लाडुजी घुले नियमित कांदा उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. त्यांनी १२ गोण्या कांदा संगमनेर बाजार समितीत विक्रीस आणल्या होत्या. त्यांना ६५३ किलो कांदा विक्रीतून वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा होता अवघे ५० रुपये मिळाले. यंदा आधीच दुष्काळाचे सावट आहे. कांदाच भविष्यात थोडाफार आर्थिक आधार देईल, अशी अपेक्षा ठेऊन सावरगाव घुले, नांदूर खंदरमाळ, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर आदी गावातील शेतकरी हे पीक घेतात. मात्र पाऊस न झाल्याने या भागातील कांदा पाण्याअभावी काही ठिकाणी जळून गेला आहे. त्यातत आहे, त्या कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नाही.
असे झाले पैसे वजा..
संगमनेर बाजार समितीतील आडतदाराकडे २० नोव्हेंबर रोजी कांदा विक्रीसाठी पाठविला होता. त्याचे दोन वेगवेगळे वक्कल होते. त्याचे एकूण वजन ६५३ किलो इतके भरले. त्यापैकी २२१ किलो कांद्याला प्रति किलोस २ रुपया इतका दर मिळाला. तर त्यापैकी ४३२ किलो कांद्याला प्रति किलोस १ रुपया ११ पैसे इतका दर मिळाला. एकूण रक्कम ९२१ रुपये ५० पैसे इतकी झाली. त्यातून हमाली ३४ रुपये ४० पैसे, तोलाई २५ रुपये, वाराई १२ रुपये तर मोटार भाडे ८०० रुपये एवढा बाजार खर्च पट्टीतून वजा करून शेतकºयाच्या हाती फक्त ५० रुपये १० पैसे उरले.
मोठ्या आशेने १२ गोण्या कांदा बाजार समितीत आणल्या. १ नंबर कांद्याला २०० रूपये प्रतिक्विंटल, २ नंबरला १०० रूपये दर मिळाला़. कांदा लागवड, कापणी, खुरपणी, औषध फवारणी आदी खर्च हजारो रूपयांत जातो़ कांद्याला भाव मिळतो, फक्त शेकडो रूपयात़ - चंद्रकांत घुले, शेतकरी, सावरगाव घुले