दोन दिवसांत कांदा खरेदी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2016 23:24 IST2016-06-03T23:16:17+5:302016-06-03T23:24:02+5:30
जवळे : केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदेरिया यांनी नगरमध्ये दोन दिवसांत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा येथे केली़

दोन दिवसांत कांदा खरेदी केंद्र
जवळे : गेल्या दोन वर्षांत शेतकरी हिताचे सर्वाधिक निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा दावा करत केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदेरिया यांनी नगरमध्ये दोन दिवसांत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा येथे केली़ त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़
केंद्रीय कृषी राज्यमंत्री व उद्योगमंत्री कलराज मिश्र शुक्रवारी नगर जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आले असता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ खासदार तथा भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय, खा़ दिलीप गांधी, नगरसेवक सुरेंद्र गांधी यावेळी उपस्थित होते़ कांद्याच्या अतिरिक्त उत्पादनाकडे कुंदेरिया यांनी लक्ष वेधले़ ते म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले, त्यामुळे भाव घसरले आहेत.परिणामी शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना धीर देण्याचे काम सरकार करत आहे़ शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने गेल्या दोन वर्षांत घेतले आहेत़ केंद्र सरकारने कांद्याची खरेदी सुरू केली आहे़ नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे़ ते नगर जिल्ह्यातही सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पारनेर तालुक्यातील जवळा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात केली़ त्यांच्या मागणीची दखल घेऊन दोन दिवसांत नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू होईल, असे आश्वासन कुंदेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिले़
पुणेमार्गे कुंदेरिया व मिश्र यांचे पारनेर तालुक्यातील जवळे गावात आगमन झाले़ गावातील दुष्काळाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला़ त्याचबरोबर जवळा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यास त्यांनी हजेरी लावली़ भाजपाच्या सरकाने दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती दोन्ही मंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली़ तेथून नगर तालुक्यातील चास गावातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची त्यांनी पाहणी केली़ दुपारी तीन वाजता ते नगर शहरात दाखल झाले़ दुपारनंतर त्यांनी राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी, राहुरी येथील स्मशानभूमिचे लोकार्पण, वांबोरीसह गावांना भेटी दिल्या़ शनिवारी ते शेवगाव तालुक्यातील दुष्काळी गावांना भेटी देऊन आदर्श सांसद गावात आयोजित मेळाव्यास उपस्थित असणार आहेत़
(वार्ताहर)
राज्यभर कांद्याची राज्य सरकारकडून खरेदी करण्यात येणार आहे़ कांदा खरेदीमुळे राज्याला होणारा तोटा केंद्र सरकारकडून दिला जाणार असल्याचे कुंदेरिया यांनी यावेळी सांगितले़