नगर बाजार समितीत कांद्यावरुन पुन्हा वांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 17:44 IST2017-08-24T17:42:31+5:302017-08-24T17:44:21+5:30
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.

नगर बाजार समितीत कांद्यावरुन पुन्हा वांदा
अहमदनगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. तसेच बाह्यवळण रस्त्यावर चक्काजाम केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. भाव कोसळल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यातही चांगलाच राडा झाला.
आज नेप्ती उपबाजार येथे कांद्याचे लिलाव सुरु झाले. लिलावात कांद्याचे भाव १८०० रुपये ते २१०० रुपये प्रती क्विंटल निघाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याचे भाव २६०० असल्याचे सांगितले. मागील वेळी भाव २६०० रुपये होता तो आज २१०० पर्यंत कसा उतरला असा सवाल शेतक-यांनी उपस्थित केला. तफावत कशी असे म्हणून शेतक-यांनी लिलाव प्रक्रिया बंद केली. या दरम्यान काही शेतकरी व कांदा व्यापारी यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यानंतर संतप्त शेतक-यांनी पुन्हा बाह्यवळण मार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको सुरु केले. यामुळे लिलाव बंद राहिले. हा गोंधळ दिवसभर सुरु होता. बाजार समितीचे सचिव अभय भिसे, सभापती विलास शिंदे, उपसभापती रेवणनाथ चोभे यांनी शेतक-यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र शेतक-यांनी माघार घेतली नाही.
शेवटी आ.शिवाजी कर्डिले आणि आ.संग्राम जगताप हे नेप्ती उपबाजारात आले. त्यांनी व्यापारी, शेतकरी, बाजार समितीचे संचालक यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात इतर बाजार समितीच्या भावांचा आढावा घेण्यात आला. बाजार समितीच्या अधिकार्यांशी चर्चा करुन भावाचा आढावा घ्यावा. एकदम लिलाव प्रक्रिया बंद करून रास्ता रोको करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरु झाली.
बाजार समितीत आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला २१०० रुपये पर्यंत भाव मिळाला. इतर बाजार समितीमधील भाव याच सरासरीचे आहेत. काही मोजके लोक लिलाव प्रक्रिया बंद करून इतर शेतक-यांना वेठीस धरत आहेत, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.