नगर जिल्ह्यात शंभर टक्के शिक्षक राहतात नियुक्तीच्या ठिकाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:44+5:302021-06-16T04:28:44+5:30
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील शंभर टक्के प्राथमिक शिक्षक त्यांची नियुक्ती ज्या गावांत आहे तेथेच राहतात, असा अहवाल जिल्हा परिषद ...

नगर जिल्ह्यात शंभर टक्के शिक्षक राहतात नियुक्तीच्या ठिकाणी
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील शंभर टक्के प्राथमिक शिक्षक त्यांची नियुक्ती ज्या गावांत आहे तेथेच राहतात, असा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. सर्वच शिक्षक खेडोपाडी निवासी राहत असल्याने कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे.
जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी किती कर्मचारी मुख्यालयी राहतात, असा प्रश्न सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. त्यावर लेखी उत्तर देताना प्रशासनाने आपल्या पंधरा हजार कर्मचाऱ्यांपैकी ९९ टक्क्यांहून अधिक कर्मचारी मुख्यालयी राहतात, असे सांगितले. त्यात ११ हजार २९३ प्राथमिक शिक्षक असून, त्यापैकी १५ शिक्षक वगळता सर्व मुख्यालयी राहतात, असा प्रशासनाचा अहवाल आहे. मुख्यालयी राहण्याचा भत्ता या सर्व शिक्षकांना दिला जातो.
सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांनाही ऑनलाइन शाळा सुरू करण्यास सांगितले आहे; मात्र आता ऑनलाइन नको तर थेट शाळा सुरू करावी, अशी परजणे यांची मागणी आहे. जवळपास शंभर टक्के शिक्षक मुख्यालयी राहत आहेत. ते खेडोपाडी ये-जा करत नसल्याने त्यांना प्रादुर्भाव होण्याचा धोका नाही. कारण अनेक गावे आता कोरोनामुक्त आहेत. शिक्षकांनी गावातील त्यांचे घर व शाळा असाच संपर्क ठेवल्यास शाळा भरविता येऊ शकतात. जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत, तेथे ग्रामस्थांशी चर्चा करून शाळा सुरू करायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेनेचे सदस्य संदेश कार्ले यांनीही या मागणीस दुजोरा दिला आहे. शिक्षक खेडोपाडी मुख्यालयी राहत असल्याने त्याचा फायदा शासनाने घ्यायला हवा. हवेतर सर्व वर्ग एकाच दिवशी न बोलविता दिवसाआड वर्ग भरवून सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षक गावातच राहत असल्याने ते वाडीवस्तीवर जाऊन मोकळ्या जागेत वेगवेगळ्या वेळी वर्ग भरवू शकतात, असा पर्याय जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनीही सूचविला आहे. तसे ‘मॉडेल’ नगर जिल्ह्यातून शासनाने सुरू करावे. त्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सूचविले आहे.
नगर जिल्ह्यात हिवरेबाजार व अनेक गावे कोरोनामुक्त झाली असल्याचे या गावांनी जाहीर केले आहे, त्यामुळे तेथील शाळा आता सुरू होणार का? याबाबत उत्सुकता आहे.
-------------
शिक्षक मुख्यालयी असतानाही उपस्थिती पन्नास टक्केच
शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती शंभर टक्के केली आहे; मात्र शिक्षण संचालकांनी यातून शिक्षकांना अपवाद केले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची उपस्थिती पन्नास टक्के असावी, असे परिपत्रक संचालकांनी काढले आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत शंभर टक्के उपस्थित राहण्याची सक्ती करता येत नाही, असे स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणजे शिक्षक शंभर टक्के गावातच राहत असतानाही शासन त्यांना शाळेत येण्यापासून रोखत आहे.
......................
साडेचारशे शाळांची तपासणी
प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात सुमारे साडेचारशे शाळांची तपासणी केली. या तपासणीत शिक्षकांची उपस्थिती चांगली आढळली, असे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिक्षकांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करावा, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.