खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:23+5:302021-08-22T04:25:23+5:30
भेंडा : शुक्रवारी (दि.२०) ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास भेंडा (ता. नेवासा) येथील मळीच्या ओढ्याजवळ खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात ...

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू
भेंडा : शुक्रवारी (दि.२०) ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास भेंडा (ता. नेवासा) येथील मळीच्या ओढ्याजवळ खड्डे चुकविताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वीच जर खड्डे बुजविले असते तर या अपघातात हा मृत्यू झाला नसता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.
नेवासा-शेवगाव रस्त्याने जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील नितीन सोमनाथ पुंड व रमेश ज्ञानदेव पुंड ( दोघेही वय २८ वर्षे) हे सख्खे चुलत भाऊ गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यासाठी १०८ रूग्णवाहिका बोलावून नेवासा फाट्यावरील खासगी रूग्णालयात उपचारासाठी तातडीने पाठविले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या नितीन पुंड यास पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने त्याचे उपचारापूर्वीच निधन झाले.
----
३ ऑगस्ट रोजी बांधकाम खात्यास मेल पाठवून संबंधित उप अभियंत्यांशी तातडीने खड्डे बुजविण्याबाबत प्रत्यक्ष चर्चा केली होती. याचे टेंडर झाले असून लवकरच खड्डे बुजविणार आहोत. असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले होते. परंतु, ठेकेदाराने या कामास विलंब लावल्याने व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर खड्ड्याने एकाच बळी घेतलाच.
-कारभारी गरड
सामाजिक कार्यकर्ते, भेंडा
-------
रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची निविदा मंजूर झाली आहे. १५ / २० दिवसांपूर्वीच कार्यारंभ आदेश झाला आहे. ३-४ दिवसात मुरूम व खडी टाकून हे खड्डे बुजविणार आहोत. पावसाळा संपल्यावर डांबरीकरणाने खड्डे बुजवू.
-युवराज कोकरे,
उपअभियंता, सा. बां. नेवासा
-----
२१ नेवासा रोड
नेवासा-शेवगाव रस्त्यावर पडलेेले खड्डे.