दीड वर्षात जिल्ह्यात ४८२ विवाहितांचा छळ
By Admin | Updated: July 10, 2014 00:32 IST2014-07-09T23:29:44+5:302014-07-10T00:32:01+5:30
अहमदनगर: जिल्ह्यामध्ये दीड वर्षामध्ये विवाहितांच्या छळांचे ४८२ गुन्हे दाखल झाले आहेत. विवाहितेने तक्रारीमध्ये नोंदविलेल्या व्यक्तीला आरोपी केले जाते.

दीड वर्षात जिल्ह्यात ४८२ विवाहितांचा छळ
अहमदनगर: जिल्ह्यामध्ये दीड वर्षामध्ये विवाहितांच्या छळांचे ४८२ गुन्हे दाखल झाले आहेत. विवाहितेने तक्रारीमध्ये नोंदविलेल्या व्यक्तीला आरोपी केले जाते. कौटुंबिक कलहाच्या या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले जाते, मात्र खटले प्रलंबित राहिल्याने छळाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या आरोपींचे प्रमाणही नगण्य असल्याचे वास्तव समोर आले आहे.
हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने चौकशीशिवाय सासरच्यांना अटक करू नये, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. हुंडाबळीच्या अनेक प्रकरणांमध्ये ४९८ (अ) या कलमाचा गैरवापर जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसते. पती व सासरच्या मंडळीकडून छळ या कारणावरून महिला थेट पोलीस ठाणे गाठतात. याबाबत नगर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २०१३ या वर्षामध्ये जिल्ह्यात ३४३ हुंडाबळीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर जानेवारी ते जून २०१४ या काळात १३९ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे दीड वर्षामध्ये तब्बल ४८२ महिलांचा छळ केल्याचे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
महिला सहायता कक्ष
पोलीस मुख्यालयात विवाहितांच्या छळाच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महिला सहायता कक्ष कार्यरत आहे. या कक्षात तीन महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना एक सहायक आहे. दिवसभर महिला, त्यांचे कुटुंबीय आणि तक्रार घेऊन येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रकरणांचा निपटारा करण्यात येतो. तडजोड करण्याचा प्रयत्न या केंद्रात केला जातो.
कोणतीही महिला कौटुंबिक छळाची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यास तिला आधी महिला सहायिका कक्षात पाठविले जाते. तेथे दोन्हीकडील संबंधित व्यक्तींना बोलावून त्यांचा संसार तुटणार नाही, यादृष्टीने समुपदेशन केले जाते.त्यांच्यातील मतभेद, गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर त्यांच्यात तडजोड झाली नाही तर अखेर नाईलाज म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित प्रकरण पोलीस ठाण्यात पाठविले जाते.
-अशोक ढेकणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण कमी आहे. खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. साक्षीदार, पुरावे मिळत नसल्याने हुंडाबळीची प्रकरणे न्यायालयात टिकत नाहीत. लगतच्या लोकांची साक्ष, छळ झाल्याबाबत विवाहितेने वडिलांना पाठविलेले पत्र किंवा अन्य पुरावा, महिलांना त्रास झाल्याबाबत साक्ष नसणे या कारणांमुळे असे खटले कमकुवत होतात. गुन्हे दाखल करताना पोलीस आणि सरकारी वकील यांचा समन्वय होणेही गरजेचे आहे.
-अॅड. सुरेश लगड, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील
का होतात गुन्हे दाखल...
क्षुल्लक कारणावरून भांडणे
पतीला रोजगार नसणे
माहेराहून पैशासाठी तगादा
व्यसनाधीन पती
नशेत होणारी मारहाण