वृक्ष लागवडीसाठी दीड लाख खड्डे
By Admin | Updated: June 24, 2016 01:14 IST2016-06-24T00:43:26+5:302016-06-24T01:14:43+5:30
अहमदनगर : सरकारी यंत्रणांमार्फत साडेतीन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, विविध यंत्रणांकडून दीड लाख खड्डे खोदले आहेत़

वृक्ष लागवडीसाठी दीड लाख खड्डे
अहमदनगर : सरकारी यंत्रणांमार्फत साडेतीन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, विविध यंत्रणांकडून दीड लाख खड्डे खोदले आहेत़ या खड्डयांत पुढील महिन्यात होणाऱ्या वृक्ष लागवड सप्ताहात रोपांची लागवड करण्यात येणार आहे़
शहरासह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहेत़ त्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे़
पाऊस पडताच जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आले आहे़
शासनाच्या कृषी, ग्रामविकास, नगरविकास, उद्योग, सहकार व पणन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, गृह विभाग, विधी व न्याय, महसूल, कृषी विद्यापीठ, देवस्थान, ऊर्जा, आदिवासी विकास विभाग, शिक्षण व क्रीडा, पशूसंवर्धन, जलसंधारण, केंद्र शासनाचे विभाग आणि अशासकीय संस्थांना जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे़ मात्र विविध विभागांकडून आलेली मागणी यापेक्षा अधिक आहे़ शासकीय कार्यालयांनी सामाजिक वन विभागाकडे ३ लाख ६३ हजार ४१४ वृक्षांची मागणी केली आहे़ त्यापैकी १ लाख ६८ हजार ८३१ खड्डेही खोदून झाले आहेत़
उर्वरित १ लाख ९४ हजार खड्डे येत्या आठ दिवसांत खोदण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली़
जिल्ह्यात १४ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते़ त्यात दोन लाखांची वाढ झाली असून, शहरासह जिल्ह्यात १६ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे़ सरकारी कार्यालयांकडून मोठ्याप्रमाणात वृक्षांची मागणी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळ, वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवडीसाठी सरसावले आहेत़
(प्रतिनिधी)