जिल्ह्यात दीडशे शाळांची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST2021-07-17T04:17:55+5:302021-07-17T04:17:55+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मध्यंतरी डिसेंबर, २०२० मध्ये प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, दहावी-बारावीचे वर्ग सुरू ...

जिल्ह्यात दीडशे शाळांची घंटा वाजली
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मध्यंतरी डिसेंबर, २०२० मध्ये प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते, परंतु कोरोनाची दुसरी लाट येऊन संसर्ग वाढल्याने, पुन्हा मार्च, २०२१ पासून वर्ग बंद करण्यात आले. पुढे ही लाट कमी होतानाची कोणतीही चिन्हे नसल्याने, शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. यात आठवीपर्यंतच्या मुलांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश दिला गेला, तर दहावी व बारावीच्या निकालांतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्याचा निर्णय झाला.
दरम्यान, २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे ॲानलाइन पद्धतीनेच सुरू झाले. काही गावे हळूहळू कोरोनामुक्त होऊ लागली. अशा कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी शासन निर्णय काढून सूचना दिल्या. त्यानुसार, शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर, तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली. नगर जिल्ह्यात एकूण १,५९६ गावे असून, त्यातील ८४९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. जिल्ह्यात आठवीपासून बारावीपर्यंत सुमारे तेराशे शाळा आहेत. या शाळांमधून ठराव मागवून १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या एकूण १,३०१ शाळा असून, त्यातील एकूण पट ३७ हजार ९२३ एवढा आहे. त्यापैकी १५ जुलैला १३३, तर १६ जुलैला १५१ शाळा जिल्ह्यात सुरू झाल्या असून, त्यात १४ हजार ७७८ विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.
----------
सर्वाधिक शाळा अकोले, राहात्यात
सुरू झालेल्या १५१ शाळांपैकी सर्वाधिक ४६ शाळा अकोले, तर २४ शाळा राहाता तालुक्यातील आहेत, शिवाय संगमनेर २२, नेवासा ११ व पाथर्डीत ११ शाळा सुरू झाल्या आहेत. सर्वात कमी म्हणजे १ शाळा कर्जत तालुक्यात सुरू झाली आहे.
--------
सुरू झालेल्या तालुकानिहाय शाळा
अकोले ४६
संगमनेर २२
कोपरगाव ४
राहाता २४
राहुरी ५
श्रीरामपूर ३
नेवासा १४
शेवगाव ४
पाथर्डी ११
जामखेड २
कर्जत १
श्रीगोंदा ४
पारनेर २
नगर ७
------------