नातींच्या हृदयस्पर्शी गळाभेटीने वृध्दाश्रम गहीरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:15 IST2018-09-27T16:09:55+5:302018-09-27T16:15:08+5:30
मांडवगण येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी विळद घाटातील मातोश्री वृध्दाश्रमातील निराधार आजोबा - आजींची सेवा केली.

नातींच्या हृदयस्पर्शी गळाभेटीने वृध्दाश्रम गहीरवला
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : मांडवगण येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी विळद घाटातील मातोश्री वृध्दाश्रमातील निराधार आजोबा - आजींची सेवा केली. यावेळी या आजोबा - आजींनी आम्हाला आमच्या नाती भेटल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी मुलींना अश्रु लपविता आले नाहीत. या हृदयस्पर्शी भेटीने मातोश्री वृध्दाश्रम गहीरवला.
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे व मुख्याध्यापिका शोभा कांबळे यांनी ही भेट घडवून आणली. वृध्दाश्रमातील आजी - आजोबा कसे राहतात, त्यांच्या वेदना समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मांडवगण येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील ६० मुलींची विळद घाटातील मातोश्री वृध्दाश्रमातील भेट आयोजित केली. मुलींनी वृध्दाश्रमातील त्यांच्या हातापायांची मालिश केली. कपडे धुतले. खोल्या साफ केल्या. त्यांच्याशी संवाद साधला. आजी-आजोबा आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी परत येऊ तुम्ही एक दिवस आमच्या शाळेत या असे निमंत्रण दिले.डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांचेही मुलांनी कौतुक केले. नम्रता शेटे, देविदास कोकाटे, सावित्री लबडे, द्रौपदी गावंडे सहभागी झाले होते.