दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्दा ठार
By Admin | Updated: July 8, 2016 23:31 IST2016-07-08T23:18:14+5:302016-07-08T23:31:45+5:30
पारनेर : पळवे- नगर-पुणे महामार्गावरील वाडेगव्हाण परिसरातील तानवडे वस्तीवर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला.

दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्दा ठार
पारनेर : पळवे- नगर-पुणे महामार्गावरील वाडेगव्हाण परिसरातील तानवडे वस्तीवर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल््यात वृध्द महिला ठार झाली. दरोडेखोरांनी सुमारे सात तोळे सोने व रोख पंचवीस हजार रूपयाची रोकड लंपास केली. घरावर पाळत ठेवून दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण गावानजीक तानवडेवस्तीवर सुधाकर ज्ञानदेव तानवडे यांच्या घराच्या मागील बाजूने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी प्रवेश केला. यावेळी तेथे झोपलेल्या पर्वतीबाई ज्ञानदेव तानवडे (वय ७०) यांच्या तोंडावर उशीने दाब देऊन व गळा दाबून खून केला. वृध्देच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या, दागिने असा सुमारे सात तोळे सोने व रोख पंचवीस हजार रूपये लंपास करून पोबारा केला. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान तानवडे कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. याची माहिती तानवडे यांनी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना दिल्यावर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
याप्रकरणी सुधाकर तानवडे यांनी फिर्याद दिली. पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, उपअधिक्षक आनंद भोईटे, सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी दरोड्याची माहिती घेतली. नगर व पुणे येथील श्वानपथक आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु तेथील श्वान आजारी असल्याने नाशिक येथून श्वान सांयकाळी उशिरा मागविण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)