साईबाबांना वर्षात एक कोटीचे हिरे अर्पण
By Admin | Updated: April 23, 2016 01:01 IST2016-04-23T00:34:46+5:302016-04-23T01:01:20+5:30
शिर्डी : साईबाबांना गेल्या वर्षभरात भाविकांनी तब्बल २२३ हिरे, जडजवाहिरे, रत्ने अर्पण केली आहेत़

साईबाबांना वर्षात एक कोटीचे हिरे अर्पण
शिर्डी : साईबाबांना गेल्या वर्षभरात भाविकांनी तब्बल २२३ हिरे, जडजवाहिरे, रत्ने अर्पण केली आहेत़ या वस्तुंची किंमत एक कोटी सहा लक्ष असून यामध्ये एका ९२ लक्ष रुपयांच्या हिरे जडवलेल्या हाराचा समावेश असल्याची माहिती संस्थानचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी दिली़
१ एप्रिल २०१५ ते २३ मार्च २०१६ या कालावधीत संस्थानला देणगी स्वरुपात २२३ हिरे, मोती, जडजवाहिरे मिळाले़ या सर्व मौल्यवान खड्यांचे नुकतेच अधिकृत व्हॅल्युअरच्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात आले़ त्यानुसार या खड्यांची किंमत एक कोटी सहा लक्ष रुपये असल्याचे झिरपे यांनी सांगितले़ यात एक सुवर्णहार आढळला आहे़ त्याच्या पॅडलमध्ये दोन हिऱ्यांचा समावेश आहे़ यातील एका हिऱ्याची किंमत ६ लक्ष ८७ हजार रुपये तर दुसऱ्याची ८५ लक्ष ४ हजार रुपये आहे़ हे हिरे ज्या सोन्याच्या साखळीत गुंफण्यात आलेले आहेत, त्या साखळीची किंमत सोळा हजार रुपये असून या हाराची किंंमत जवळपास ९२ लक्ष आहे. संस्थानकडे सुमारे ९ कोटी १६ लक्ष रुपयांचे हिरे, जडजवाहिरे, ३९२ किलो सोने, ४१७८ किलो चांदी आहे़ तर विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १५८७ कोटींच्या ठेवी आहेत़ (तालुका प्रतिनिधी)