बांधकामाच्या परवानगीसाठी आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:40+5:302021-04-08T04:21:40+5:30
अहमदनगर : वारूळवाडी (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत घेतलेल्या जागेवर घराचे बांधकाम करण्याच्या परवानगीसाठी सरपंच अडवणूक करीत असल्याचा आरोप करून ...

बांधकामाच्या परवानगीसाठी आडकाठी
अहमदनगर : वारूळवाडी (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत घेतलेल्या जागेवर घराचे बांधकाम करण्याच्या परवानगीसाठी सरपंच अडवणूक करीत असल्याचा आरोप करून जागामालक असलेल्या महिलेस बांधकामास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार व माजी सभापती रामदास भोर यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, नाजनीन अहेसान शेख, अहेसान शेख, आदी उपस्थित होते. उपसभापती पवार व माजी सभापती भोर यांनी सदर महिलेच्या घराच्या बांधकामासाठी रीतसर परवानगी देण्यास अडचण येणार नसून, अशा प्रकारे नगर तालुक्यात बांधकामासाठी अडवणूक होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
जागामालक नाजनीन अहेसान शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विकत घेतलेल्या प्लॉटमध्ये बांधकाम चालू केले. परंतु बांधकाम पाया लेव्हलपर्यंत आले असता गावातील ग्रामपंचायतीतर्फे तुम्ही अवैध काम करीत असल्याचे सांगून घराचे बांधकाम थांबविण्यात आले आहे. मुळात रीतसर बांधकाम परवानगी मिळण्यासाठी वारूळवाडी ग्रामसेवक यांच्याकडे लेखी मागणी केलेली आहे. तरीही अडवणूक होत आहे. या महिलेच्या घराच्या बांधकामास वारूळवाडी ग्रामपंचायतीने रीतसर परवानगी देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पोटे यांनी दिला आहे.