कर्जत : आम्ही कोरोनाबाबतचे शासनाचे सर्व नियम पाळू. दिवसभरातील काही तास तरी दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी कर्जत शहरातील व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना दिले.
राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामध्ये अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. मात्र मागील वर्षापासून व्यापारी, इतर छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. सर्व व्यवहार आता काहीसे सुरळीत सुरू झाले होते. मात्र पुन्हा व्यवहार बंद झाल्याने सर्वच व्यापारी अडचणीत आले आहेत. शासनाच्या सर्व नियमांना व्यापारी बांधवांचा पाठिंबा आहे. दुकाने बंद करू नयेत. दररोज काही तास तरी दुकाने सुरू ठेवण्यात परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
कर्जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन भोज, मेन रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे, उपाध्यक्ष प्रसाद शहा, सचिव बिभीषण खोसे, खजिनदार संजय काकडे, स्वप्निल देसाई, अभय बोरा, विजय तोरडमल, राम ढेरे, किशोर कुलथे, सुरेश नहार, संतोष भंडारी, सुनील निलंगे यांच्यासह काही व्यापारी उपस्थित होते.
--
०८ कर्जत निवेदन
कर्जत शहरातील दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन व्यापारी संघटनेने प्रशासनाकडे दिले आहे. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, मुख्याधिकारी गोविंद जाधव व इतर उपस्थित होते.