ओ शेट, या रस्त्याने आम्ही सुरक्षित जाऊ का थेट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:46+5:302021-09-02T04:44:46+5:30
नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यातच जागतिक दर्जाचे शिर्डीच्या साईबाबांचे देवस्थान याच मार्गावर आहे. वेगवेगळी कारखानदारी, शाळा, ...

ओ शेट, या रस्त्याने आम्ही सुरक्षित जाऊ का थेट?
नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यातच जागतिक दर्जाचे शिर्डीच्या साईबाबांचे देवस्थान याच मार्गावर आहे. वेगवेगळी कारखानदारी, शाळा, महाविद्यालये, मोठमोठी हॉस्पिटल्स यासह इतरही अनेक गोष्टी याच महामार्गालगत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात सर्वच प्रकारच्या वाहनांची गर्दी असते. या मार्गाची दुरवस्था झाल्याने कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत केवळ याच खड्डेमय मार्गामुळे अनेक बाधित रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचता न आल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक निष्पाप व्यक्तींना खड्डे चुकविण्याच्या नादात मोठ्या वाहनांच्या चाकांच्या भक्षस्थानी जावे लागले आहे. त्यावर यंदाच्या पावसाळ्याअगोदर कोट्यवधी रुपये खर्चून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, काही दिवसांतच हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला. सद्य:स्थितीत पाऊस सुरू असल्याने खड्ड्यात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना खड्डे लक्षात येत नसल्याने मागील आठवड्यात एका नवविवाहितेला अपघातात आपला जीव जागीच गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. एवढे सर्व होत असतानादेखील हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. हे या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
.............
मी माझ्या व्यवसायाच्या निमिताने दररोज या रस्त्याने माझ्या चार चाकी वाहनातून जातो. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच वाहनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे कायमस्वरूपी काम होऊन मार्गी लागले पाहिजे.
- मिलिंद कपोते, कोपरगाव
...........
मी एक नोकरदार आहे. या रस्त्याने दुचाकी चालविताना खूप कसरत करावी लागते. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी एवढीच अपेक्षा.
- प्रमोद दारकुंडे, कोपरगाव
........
यासंदर्भात या महामार्गाच्या नगर येथील जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एन. एन. राजगुरू यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.
..........
फोटोओळी -
कोपरगाव तालुका हद्दीत नगर-मनमाड राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे.
.........
फोटो३१ : नगर-मनमाड महामार्ग चाळण - कोपरगाव