नगर जिल्ह्यातील पोलिसांची संख्या वाढणार; पोलीस महासंचालक सतीश माथूर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:43 IST2017-11-22T20:42:39+5:302017-11-22T20:43:26+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. परंतु, जबरी चो-या व घरफोड्यांची संख्या वाढली आहे. जिल्हा विस्ताराने देखील मोठा आहे. तुलनेत मनुष्यबळ कमी असून जिल्ह्याला लवकरच नव्याने मनुष्यबळ दिले जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगर जिल्ह्यातील पोलिसांची संख्या वाढणार; पोलीस महासंचालक सतीश माथूर यांची माहिती
अहमदनगर: जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. परंतु, जबरी चो-या व घरफोड्यांची संख्या वाढली आहे. जिल्हा विस्ताराने देखील मोठा आहे. तुलनेत मनुष्यबळ कमी असून जिल्ह्याला लवकरच नव्याने मनुष्यबळ दिले जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस महासंचालक माथूर यांनी बुधवारी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, घनश्याम पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपाधीक्षक आनंद भोईटे आदी यावेळी उपस्थित होते. सांगली येथील घटना निंदनीय आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन पोलिसांनी हे कृत्य केले असून, या प्रकरणी सहा पोलिसांना खात्यातून काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर यासंदर्भात राज्यातील प्रमुख अधिका-यांची लवकरच बैठक घेऊन आरोपींना मारहाण न करता तपास करण्याबाबतचा आदेश देण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. परंतु, जबरी चो-या व घरफोड्यांची संख्या वाढली आहे. जिल्हा विस्ताराने मोठा आहे़ तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. त्यात शिर्डी देवस्थानचाही भार पोलिसांवर आहे. त्यामुळे जिल्ह्याला मनुष्यबळ दिले जाईल. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या दीडशे होमगार्डची नियुक्ती केली जाणार असल्याचे माथूर म्हणाले. शहरासह जिल्ह्यातील तीन उपविभागीय कार्यालये व तीन पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट मानले जाणारे आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र यावेळी माथूर यांच्या हस्ते संबंधित पोलीस अधिका-यांना प्रदान करण्यात आले.
अचानक नाकाबंदी
महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. गुंड दादागिरी करणा-यांना मॅप करून ताब्यात घेतले जाईल. त्यासाठी अचानक नाकाबंदी करून दिवसा कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.
यांना मिळाले मानांकन
पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी नगर तालुका उपविभागीय कार्यालय, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी शहर विभागीय कार्यालय, उपाधीक्षक अभिजित शिवथरे यांनी शेवगाव विभागीय कार्यालय, सहायक पोलीस निरीक्षक अॅड़ विनोद चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी लोणी पोलीस ठाणे आयएसओ मानांकन करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. तसेच मोटारसायकल परिवहन विभागास आएसओ मानांकन मिळाले आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणा-यांचा गौरव
पोलीस उपनिरीक्षक एकनाथ मातोंडकर (पारनेर), हेड कॉन्स्टेबल आसाराम क्षिरसागर (पारनेर), हेड कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण (पारनेर), पोलीस कॉन्स्टेबल नकुल टपरे (नियंत्रण कक्ष, नगर), पोलीस निरीक्षक दिलीप पवार (स्थानिक गुन्हे शाखा),सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे (स्थानिक गुन्हे शाखा), सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा),पोलीस निरीक्षक रविकीरण सोनटक्के, (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, (स्थानिक गुन्हे शाखा) कर्जत उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, शहर वाहतूक शाखे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, जामखेड येथील पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण व गहिनीनाथ यादव, श्रीरामपूर येथील फौजदार अन्सार शेख, सहायक फौजदार रावसाहेब कुसळकर, शिर्डी पोलीस ठाण्यातील महिला फौजदार दिक्षा लोकडे, पोलीस नाईक राजेंद्र औटी यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात आला.