जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ‘स्थिर’ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:46+5:302021-09-02T04:45:46+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांपैकी ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित होत आहेत. गत ...

The number of corona patients in the district is 'stable' - A | जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ‘स्थिर’ - A

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ‘स्थिर’ - A

अहमदनगर : जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांपैकी ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित होत आहेत. गत महिनाभरापासून हाच आकडा कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना वाढला किंवा कमी झाला असे नाही तर रुग्णांची संख्या स्थिर आहे. एखाद्या दिवशी बाधितांची संख्या कमी किंवा जास्त झाली तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही सरासरी पाच हजार एवढीच आहे.

राज्यात पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये अहमदनगरसह पुणे, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ७०० ते ८०० एवढी सरासरी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामध्ये पारनेर, संगमनेर, कर्जत, श्रीगोंदा, अकोले या तालुक्यात रुग्णसंख्या स्थिरच आहे. संपर्क, संसर्ग, गर्दीचे कार्यक्रम होत असल्याने आणि नागरिक नियम पाळत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

सोमवारी जिल्ह्यात ५५९४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ८८७ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता पाच हजार ४३६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४०२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५४ आणि अँटिजन चाचणीत २३१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या शंभरच्या पुढे आढळून आली.

--------------

सक्रिय रुग्णांमध्ये अहमदनगर चौथे

पुणे- १३,५०३

ठाणे- ७२८३

सातारा- ५५१५

अहमदनगर- ५१६८

सोलापूर- ४२२४

सांगली- ४७१२

-------------

संगमनेरमध्ये आधीपासूनच रुग्णांची संख्या सर्वाधिक राहिलेली आहे. पारनेर तालुक्यात दोन-तीन महिन्यांपासून शंभरपुढे रुग्णसंख्या आहे. एखाद्या ठिकाणी आधीपासूनच रुग्णसंख्या जास्त असेल तर तिथे बाधित होण्याचे प्रमाण तेवढेच राहते. चाचण्यांपैकी बाधित होणाऱ्यांचे प्रमाण ५ टक्के आहे. हे प्रमाण गत दोन महिन्यांपासून स्थिर आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत, असे म्हणता येत नाही.

- डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय

----

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : ३,१०,६६८

उपचार सुरू असलेले रुग्ण : ५४३६

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६५२९

एकूण रुग्णसंख्या : ३,२२,६३३

----------

दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह

दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे. लसीचा प्रभाव हा लाइफटाइम राहील, असे मुळीच नाही. ते एक सुरक्षा कवच आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतले तरी नागरिकांनी मास्क घालणे आवश्यक आहे. मात्र नागरिक मास्क घालण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित झाल्यास नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. जमधडे यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही डोस घेतले असले तरी नियमांचे पालन केल्याशिवाय पर्याय नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी सांगितले.

Web Title: The number of corona patients in the district is 'stable' - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.