शहरातील केबलधारकांची संख्या घटली
By Admin | Updated: July 29, 2016 17:55 IST2016-07-29T17:51:08+5:302016-07-29T17:55:25+5:30
अहमदनगर : सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर शहरातील केबलधारकांची संख्या वाढली आहे़

शहरातील केबलधारकांची संख्या घटली
अहमदनगर : सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर शहरातील केबलधारकांची संख्या वाढली आहे़ मात्र बहुविध परिचालक यंत्रणांनी ही आकडेवारीच लपविण्याचा प्रयत्न चालविला असून, ही बाब जिल्हा करमणूक शाखेच्या निदर्शनास आली आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फरकाची रक्कम भरण्याबाबतची नोटीस गुरुवारी बहुविध यंत्रणांना गुरुवारी बजावली आहे़
शहरासह जिल्ह्यातील केबलधारकांना सेट टॉप बॉक्स बसविणे सरकारने बंधनकारक केले आहे़ सेट टॉप बॉक्स न बसविणाऱ्या केबलधारकांचे दूरचित्रवाणी मध्यंतरी बंद करण्यात आले होते़ त्यामुळे या मोहिमेला गती मिळाली आहे़ परिणामी सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर केबलधारकांची संख्या वाढणे अपेक्षित होते़ अपेक्षेप्रमाणे केबलधारकांची संख्या १५वरून २२ हजार झाली़ तशी माहिती केंद्र सरकारकडून जिल्हा करमणूक शाखेस कळविण्यात आली आहे़ करमणूक कर वसुलीसाठीही ही आकडेवारी गृहीत धरली जाणार आहे़ असे असले तरी बहुविध परिचालक यंत्रणांनी यापेक्षाही कमी आकडेवारी सादर केली असून, सुमारे ३ हजार केबलधारकांचा फरक आहे़ प्रति केबलधारक ४५ रुपये, याप्रमाणे कर वसूल करण्यात येतो़ परंतु बहुविध यंत्रणांनी संख्या घटविल्यामुळे जिल्हा करमणूक शाखेने बहुविध यंत्रणांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे़ त्यामुळे प्रत्यक्षातील आकडेवारी सादर करणे बंधनकारक झाले असून, यामुळे करमणूक करात मोठी वाढ होणार असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले़
केबलधारकांची संख्या कमी दाखवून लाखो रुपये कर बुडविण्यात आला आहे़ मात्र आॅनलाईन प्रणालीमुळे कर बुडेगिरीला आळा बसला आहे़ सेट टॉप बॉक्स बसविण्यापूर्वीची आणि त्यानंतरची संख्या, याचा हिशोब सध्या सरकारकडून मांडला जात आहे़ सरकारची आकडेवारी आणि बहुविध यंत्रणांनी बसविलेले सेट टॉप बॉक्स, ही संख्या सारखी, आल्यानंतरच यातील त्रुटी दूर झाल्या आहेत, असे म्हणण्यास वाव आहे़ परंतु, तसे होताना दिसत नाही़ अपेक्षेप्रमाणे केबलधारकांची संख्या वाढली खरी, पण बहुविध यंत्रणांनी ती कमी दाखविल्याने पहिले पाढे पंचावन्न, अशी स्थिती निर्माण झाली असून, बहुविध यंत्रणांना नोटिशीव्दारे विचारणा करण्यात आली आहे़ त्यावर बहुविध यंत्रणा काय उत्तर देतात, यावरच पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे़
(प्रतिनिधी)