अकोलेतील आकडा दिवसेंदिवस वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:32+5:302021-04-19T04:18:32+5:30
दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आदिवासी भागात निरोगी निसर्ग असला तरी डोंगरदरीतील खेड्यापाड्यांत कोरोना शिरल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...

अकोलेतील आकडा दिवसेंदिवस वाढतोय
दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आदिवासी भागात निरोगी निसर्ग असला तरी डोंगरदरीतील खेड्यापाड्यांत कोरोना शिरल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, नागरिकांनी लाॅकडाऊनचे निर्बंध कडकपणे पाळल्यास कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी तालुक्याची कोविड स्थिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन करून सांगितली. कोविड लस व ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा, अशी मागणी केली. दोन दिवसांत परिस्थिती सुधारेल, असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला. ही आश्वासक बाब असली तरी नागरिकांनी लाॅकडाऊनचे नियम कडकपणे पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तालुक्यात सरकारी प्रशासन, अगस्ती साखर कारखाना, सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने खानापूर १४०, अगस्ती आश्रम २००, राजूर १८०, कोतूळ ८०, समशेरपूर ३०, ब्राह्मणवाडा ५०, खाजगी हरिश्चंद्र, माऊली व साई जीवन कोविड केअर केंद्रांत जवळपास ७०० बेड आहेत. तालुक्यात आजमितीस ६२७ सक्रिय कोविड रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभिरे सांगतात.
खानापूर शासकीय कोविड सेंटर ३०, हरिश्चंद्र हाॅस्पिटल ४०, माऊली कोविड केअर सेंटर १०, असे बोटावर मोजण्याइतके ऑक्सिजन बेड आहेत. म्हणून काही रुग्ण संगमनेर, नाशिक येथे उपचार घेत आहेत.
............
संकटकाळात करावी मदत
तालुक्यात जवळपास ४६ पतसंस्था आहेत. यातील तीन- चार पतसंस्थांच्या ठेवी प्रत्येकी साधारण १५० ते १७५ कोटींदरम्यान आहेत. सहायक उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाच्या माहितीनुसार तालुक्यात ६,७०० कोटींपर्यंत ठेवी असाव्यात. संकटकाळात पतसंस्थांनी कोविड केअर केंद्रांना भरीव मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
...........
तालुक्यात १४७ ग्रामपंचायती आहेत. कृत्रिम ऑक्सिजन तयार करणाऱ्या यंत्राची किंमत २५ ते ३५ हजार रुपये आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान एक व सक्षम ग्रामपंचायतींनी एकापेक्षा अधिक यंत्र घेतल्यास तालुक्यात तीन- चारशे ऑक्सिजन बेडचे हाॅस्पिटल सुरू होऊ शकते. त्यासाठी विद्यमान आमदार, माजी आमदार, सजग सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा.
-डाॅ. अनिल वाघ, तालुकाध्यक्ष, मेडिकल असोसिएशन