नगर जिल्हा परिषदेत आता आॅनलाईन अभिप्राय
By Admin | Updated: July 29, 2016 17:48 IST2016-07-29T17:45:50+5:302016-07-29T17:48:48+5:30
अहमदनगर : सरकारी लालफितीचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी नगर जिल्हा परिषद प्रशासनाने आॅनलाईन टिपण्या (अभिप्राय) लिहिण्याच्या अनोखा प्रयोग केला आहे.

नगर जिल्हा परिषदेत आता आॅनलाईन अभिप्राय
अहमदनगर : सरकारी लालफितीचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी नगर जिल्हा परिषद प्रशासनाने आॅनलाईन टिपण्या (अभिप्राय) लिहिण्याच्या अनोखा प्रयोग केला आहे. प्रत्येक कामाच्या फाईलमध्ये आॅनलाईन टिपणी लिहिणारी नगर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार आहे. आॅनलाईन टिपणीमुळे जिल्हा परिषद प्रशासनाचा वेळ, पैसा वाचण्यासोबत कामाची गोपनीयता वाढणार आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनाने अथर्व सॉफ्टेक या संस्थेकडून ‘ई फाईल प्रणाली’ तयार करून घेतली आहे. या प्रणालीत क्यू आर आणि बार कोड टाकून ही आॅनलाईन टिपणी तयार करण्यात येणार आहे. या ई फाईल प्रणालीचा वापर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाला करता येणार आहे. विशेष म्हणजे या ई फाईलमध्ये एकदा तयार झालेल्या टिपणीत पुन्हा कधीच बदल करता येणार नाही. ई फाईलमध्ये प्रत्येक पानावर बार कोड आणि क्यू आर कोड राहणार आहे.
या दोन्ही पैकी कोणताही एक कोड स्कॅन केल्यावर संबंधित फाईल कोणत्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात आहे. त्यावर काय कार्यवाही झाली याचा संपूर्ण तपशील समजणार आहे. देशात सध्या डिजिटल इंडियाचे वारे वाहत असून सरकारी कार्यालयात ई आॅफिस राबवण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून आता आॅनलाईन टिपणी देण्याचा प्रयोग जिल्हा परिषद राबविणार आहे. गुरूवारी सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या आॅनलाईन टिपणीचे प्रशिक्षण दिले आहे. पहिल्या १५ दिवसात हा प्रयोग केवळ सामान्य प्रशासन विभागात राबवण्यात येणार असून त्यानंतर अन्य विभागात ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ई आॅफिसच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात सामान्य प्रशासन विभागात ई टिपणी लिहिण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत सेंटर सर्व्हर यंत्रणा कार्यान्वित केल्यावर पूर्ण क्षमतेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ई टिपणी सिस्टीममुळे अधिकारी बदलल्यावर फाईलमधील टिपणी बदलता येणार नाही.
-रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. अहमदनगर.