..आता जिल्ह्यातील गुन्हेगारांची खैर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:49+5:302021-03-09T04:23:49+5:30
श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणानंतर जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी गुन्हेगारांना सावध ...

..आता जिल्ह्यातील गुन्हेगारांची खैर नाही
श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणानंतर जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी गुन्हेगारांना सावध होण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही गुन्हेगारांची आता खैर केली जाणार नाही. पोलिसांनीही गुन्हे दाखल करताना दिरंगाई केली तर त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात हिरण यांच्या हत्येप्रकरणी दोघा आरोपींना अटक केल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, संगमनेर येथील उपअधीक्षक राहुल मदने उपस्थित होते.
पाटील म्हणाले, जिल्ह्यात पूर्वी एका महिन्यात २६० गुन्हे विलंबाने दाखल होत होते. आता मात्र हे प्रमाण ८० वर आले आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल न होणे ही भविष्यकाळासाठी धोक्याची घंटा असते. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढविले आहे. त्यात हलगर्जीपणा केलेल्या २१ पोलिसांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील वाळू तस्करीतील गुन्हेगारीवर पाटील यांनी चिंता व्यक्त केली. कोणत्याही आरोपींना सोडले जाणार नाही. त्यांनी आता सावध व्हावे. श्रीरामपूर येथील तीन आरोपींवर मोक्काचा प्रस्ताव तयार आहे. आणखी आरोपींवरही कारवाई प्रस्तावित आहे. झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाया हाती घेण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांच्या याद्या संकेतस्थळावर संकलित करण्यात आल्या आहेत. दीड व दोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गंभीर गुन्हेगारांवर कडक कारवाईची अंमलबजावणी केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.