आता अँटिजन चाचणीसह वाहनांचीही जप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST2021-05-19T04:22:04+5:302021-05-19T04:22:04+5:30
नगर शहरात मंगळवारी पोलिसांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली, तर काहीजणांचे वाहनेही जप्त केले. १ जूनपर्यंत ...

आता अँटिजन चाचणीसह वाहनांचीही जप्ती
नगर शहरात मंगळवारी पोलिसांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली, तर काहीजणांचे वाहनेही जप्त केले. १ जूनपर्यंत ही वाहने पोलीस स्टेशनमध्ये ठेवली जाणार आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू करत संचारबंदी केली आहे. मात्र, बहुतांशजण विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. अशा बेफिकीर लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने नगर शहरासह जिल्हाभरात रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहेत. सोमवारी जिल्हाभरात केलेल्या अँटिजन चाचणीमध्ये तब्बल ५० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जे पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांना सरकारी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी पथकासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.