संगमनेर : रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन वितरित न केल्याने संगमनेरमधील चार मेडिकलना तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर अमोल निकम यांनी नोटीस बजावली आहे. साथ रोग अधिनियम अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली असून, खुलासा सादर करावा, असे त्यात म्हटले आहे. हा खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास या मेडिकलवर कारवाईसाठी अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांना प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
साई कृष्णा मेडिकल स्टोअर्स, ओम गगनगिरी मेडिकल, सुयश मेडिकल व बाफना मेडिकल या चार दुकानांना तहसीलदार निकम यांनी साथ रोग अधिनियम १७९८ अंतर्गत शुक्रवारी (दि. १६) नोटीस बजावली. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा कोरोना रुग्णांच्या संख्येप्रमाणे रुग्णालयांना वितरित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे.
परंतु, साई कृष्णा मेडिकल स्टोअर्स, ओम गगनगिरी मेडिकल, सुयश मेडिकल व बाफना मेडिकल या मेडिकल दुकानदारांनी रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयांना वितरित न केल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. प्रशासकीय यंत्रणेमार्फत विहीत केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी हे मेडिकल दुकानदार करत नसल्याची गंभीर बाब समोर आल्याने तहसीलदार निकम यांनी त्यांना नोटीस पाठवली. नोटीस मिळताच दोन तासात लेखी व समाधानकारक खुलासा सादर करावा, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे आता काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन वितरित न केल्याने संगमनेरातील चार मेडिकल दुकानांना साथ रोग अधिनियम १७९८ अंतर्गत नोटीस बजावली होती. त्यांनी खुलासा सादर केला आहे. तो पाहून अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे.
- अमोल निकम, तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर, संगमनेर
--------------
बाफना मेडिकलकडे ९६ मिळून एकूण २८८ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होती. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्यातून रुग्णालयांना इंजेक्शन वितरित करणे गरजेचे असताना ती का दिली गेली नाहीत? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संबंधित रूग्णालयांमध्ये कोरोनाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.