जामखेडच्या पाच कृषी सेवा केंद्रांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:09+5:302021-06-09T04:26:09+5:30
जामखेड : बियाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकाने जामखेड तालुक्यातील १५ कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. ...

जामखेडच्या पाच कृषी सेवा केंद्रांना नोटिसा
जामखेड : बियाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकाने जामखेड तालुक्यातील १५ कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. त्यातून पाच कृषी केंद्रांवर रजिस्टर उपलब्ध नसणे, बियाणांचा साठा फलक नसणे आदी कारणांमुळे नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. दरम्यान, यंदा तालुक्यातील जवळा, खर्डा, जामखेड परिसरातील ८० टक्के पेरण्या योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी कृषी दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
उडीद, तूर, कपाशी बियाणांची मागणी वाढली आहे. तालुक्यात बियाणांची कमतरता भासू नये यासाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यातून, परराज्यातून बियाणांची मागणी केली आहे.
तालुक्यात खरीप हंगाम यशस्वी व्हावा यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी विभाग व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पवार यांच्या संकल्पनेतून विविध प्रयाेग राबविले जात आहेत. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, कर्जतचे कृषी अधिकारी दीपक सुपेकर आणि जामखेडचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांची बैठक घेऊन खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणांची मागणी व पुरवठा याबाबत नियोजन करण्यात आले.
तालुक्यात यंदा ३५ हेक्टर क्षेत्रात उडीद, १५ हजार हेक्टर क्षेत्रात तूर पेरणी होईल, असा अंदाज कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या वाणाचा आग्रह धरू नये. सर्व कंपन्यांच्या वाणाचे उत्पन्न आणि दर्जा सारखाच असल्याचे त्यांनी सांगितले.
----
०७ जामखेड कृषी
जामखेड शहरातील कृषी सेवा केंद्राबाहेर बियाणे खरेदीसाठी सोमवारी शेतकऱ्यांची झालेली गर्दी.