आर्थिक परिस्थिती नाही, कामे कशी करणार ?
By Admin | Updated: March 31, 2016 00:04 IST2016-03-31T00:03:00+5:302016-03-31T00:04:47+5:30
अहमदनगर : ‘हार्ट आॅफ सिटी’ची जागा म्हणून ओळखली जाणारी चितळे रस्त्यावरील जागा बिल्डरच्या घशात घालण्यास युतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे

आर्थिक परिस्थिती नाही, कामे कशी करणार ?
अहमदनगर : ‘हार्ट आॅफ सिटी’ची जागा म्हणून ओळखली जाणारी चितळे रस्त्यावरील जागा बिल्डरच्या घशात घालण्यास युतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. महापालिका निधीतून अथवा कर्ज काढून व्यापारी संकुल-भाजी मंडई उभारावी, असे लेखी पत्र युतीने महासभेत महापौर अभिषेक कळमकर यांना दिले. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही, तेथे कर्तृत्व तरी काय करणार? अशी हतबलता महापौर कळमकर यांनी मार्केटच्या चर्चेदरम्यान व्यक्त केली.
मंगळवारी तहकूब झालेली अर्थसंकल्पीय सभा महापौर तथा पीठासीन अधिकारी अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. कुष्ठरोगी, अपंग व मनोरुग्णांना दरमहा एक हजार रुपये मानधन देण्याच्या विषयावर त्यातील तरतुदीत वाढ करावी, अशी मागणी बाळासाहेब बोराटे यांनी केली. रुग्णांचा प्रतिसाद मिळत नसलेले दवाखाने बंद करण्याऐवजी नवीन दवाखाने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. नेहरू मार्केटच्या जागेचा विषयही बोराटे यांनी उपस्थित केला. मोक्याच्या ठिकाणची जागा सव्वादोन कोटीत बिल्डरला कशी काय देता, त्यापेक्षा ती महापालिकेने विकसित करावी, अशी मागणी करत बोराटे यांनी प्रीमियम कमी कसा झाला, यावरून प्रशासनाला धारेवर धरले. साडेचार कोटीचा प्रीमियम सव्वादोन कोटीवर कसा, असा सवाल केला असता साडेचार कोटीच्या प्रीमियमचा ठरावच झाला नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला. त्यास किशोर डागवाले यांनी आक्षेप घेतला. २०१० साली असा ठराव झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बीओटीवर निविदा दाखल करण्यास प्रतिसाद मिळाला नाही. सहा वर्षे निविदेत गेल्यानंतर महापालिकेने मार्केट उभारणीसाठी काहीच केले नाही. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात मनपा निधी/बॅँक कर्जाचा पर्याय ठेवलेला होता. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नसल्याकडे अनिल शिंदे यांनी लक्ष वेधले. चांगले कर्तृत्ववान अधिकारी महापालिकेकडे आहेत, महापौरही उच्चशिक्षित आहेत, त्यांच्या शिक्षितपणाचे पडसाद अर्थसंकल्पात उमटले पाहिजेत, अशी मागणी शिंदे यांनी केली. त्यावर बोलताना महापौर कळमकर यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही, कर्तृत्व काय करणार? अशी हतबलता व्यक्त केली. सहा वेळेस निविदा मागवून प्रतिसाद मिळाला नाही, महापालिकेने मार्केट बांधण्याचा एक प्रयत्न करण्यास हरकत नाही, असे डागवाले यांनी सभागृहात सांगितले. युतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.