एका गावातील उत्तर भाग जिथे आजही दुमजली घरे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:01+5:302021-09-24T04:24:01+5:30
खर्डा : प्रत्येक गावाची आपली एक स्वतंत्र अशी प्रथा, परंपरा असते. तशीच येथील ऐतिहासिक खर्डा (ता. जामखेड) गावाची एक ...

एका गावातील उत्तर भाग जिथे आजही दुमजली घरे नाहीत
खर्डा : प्रत्येक गावाची आपली एक स्वतंत्र अशी प्रथा, परंपरा असते. तशीच येथील ऐतिहासिक खर्डा (ता. जामखेड) गावाची एक अनोखी परंपरा आहे. प्रथेनुसार गावाच्या उत्तरेकडील अर्ध्या भागात आजही दुमजली इमारत बांधली जात नाही. एक ते दोन कुटुंब सोडले तर जवळपास या भागातील ९९.९९ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.
ऐतिहासिक वारसा, पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र, मोठी बाजारपेठ, शैक्षणिक केंद्र, आरोग्य सुविधा केंद्र, येथून जाणारा शिर्डी-हैदराबाद महामार्ग, नव्याने विकसित होत असलेला पैठण-पंढरपूर पालखी महामार्ग यामुळे खर्डा शहराचा विकास मोठ्या गतीने सुरू आहे. जुन्या गावातील वाडे पाडून मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि आणखी नवीन कामे सुरू आहेत. मोठ्या शहरांना लाजवेल अशी सुसज्ज, भव्य बाजारपेठ येथे उभी राहत आहे. परंतु, एवढी मोठमोठी स्थित्यंतर घडत असतानाच गावाचा अर्धा (उत्तर दिशेचा) भाग मात्र अजूनही दुमजली इमारती विनाच आहे. शुक्रवार पेठ, कसबा पेठ, सुतार नेट, मोमीन गल्ली, सुर्वे गल्ली, चांभारवाडा अशा गावातील मोठ्या परिसरात अद्यापही दुमजली इमारती बांधल्या जात नाहीत. १४ हजार लोकवस्तीच्या गावात साधारण दीड हजार घरे उत्तर भागात आहेत. त्या घरांवर दुसरा मजला चढविलेला नाही. या भागातही गवंडी, ठेकेदारही दुसरा मजला बांधण्यास येत नसल्याचे नागरिक सांगतात. गावात एका-दोघांनी सर्वांची टीका टिप्पणी स्वीकारून रूढी, परंपरांना फाटा देत दुमजली इमारत बांधली आहे. परंतु, ९९.९९ टक्के लोकांनी मात्र परंपरा पुढे चालविली आहे.
----
म्हणून दुमजली घर बांधत नाहीत..
ग्रामदैवत कान्होबावर (कानिफनाथ) गावकऱ्यांची गाढ श्रद्धा आहे. गावाच्या उत्तरेस उंच टेकडीवर कान्होबाचे मंदिर आहे. हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजाची कान्होबावर श्रद्धा आहे. मोठ्या इमारती बांधल्यास टेकडीवरील कान्होबा मंदिर दिसणार नाही व गावात अनर्थ ओढवेल, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. कर काही जुन्या-जाणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार पूर्वीचे सरदार निंबाळकर यांची गढी गावाच्या मध्यभागी आहे. या भव्य गढीच्या सभोवती मोठी इमारत होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या कथा तयार करून अशा परंपरांना खतपाणी घातले जात आहे, असेही काही ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. काहींनी दुमजली इमारती बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कशी संकटे आली याच्याही चर्चा गावात केल्या जातात.
-----
देशसेवा करून आलो आहे. कष्टाचा पैसा आहे. देशसेवा केल्यामुळे ग्रामदैवत माझे रक्षण नक्कीच करील. मी अंधश्रद्धा पाळत नाही. देशसेवा हीच माझी श्रद्धा आहे.
-बबन नाईक
सेवानिवृत्त सैनिक, खर्डा
-----
कुटुंब वाढत चालले आहे. जागेची कमतरता जाणवते. युग कुठे चालले. अंधश्रद्धा बाळगून चालणार नाही. मनात ग्रामदैवत विषयी श्रद्धा आहे. मात्र मी अंधश्रद्धा मानत नाही. ग्रामदैवत आपले रक्षण करते तर घाबरायचे कशाला. कोणत्या ग्रंथात, कथेत लिहिले नाही दुमजली इमारत बांधू नका.
-अशोक खारगे,
सामाजिक कार्यकर्ते, खर्डा
-----
२३ खर्डा१, २
खर्डा येथील एका बाजूला असलेल्या बहुमजली इमारती तर दुसऱ्या बाजूला अशी एकाच छताची घरे आहेत.