नगरमध्ये आदिवासी वसतिगृहातील मुलांचे ‘अन्यत्याग’ उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:47 IST2017-12-02T15:47:20+5:302017-12-02T15:47:40+5:30
आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोणत्याही सुविधा मिळत नसून, वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्त्यांवर दडपशाही करतात, त्यामुळे त्यांची बदली करावी आदी मागण्यांसाठी वसतिगृहातील ६५ विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘अन्नत्याग’ उपोषण केले.

नगरमध्ये आदिवासी वसतिगृहातील मुलांचे ‘अन्यत्याग’ उपोषण
अहमदनगर : येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोणत्याही सुविधा मिळत नसून, वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्त्यांवर दडपशाही करतात, त्यामुळे त्यांची बदली करावी आदी मागण्यांसाठी वसतिगृहातील ६५ विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘अन्नत्याग’ उपोषण केले.
सावेडीतील भिस्तबाग चौकात आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. शिक्षणासाठी नगरमध्ये असलेले राज्यातील आदिवासी विद्यार्थी येथे राहतात. परंतु विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. जेवण निकृष्ट दिले जाते. वसतिगृहाचे गृहपाल धनंजय खेडकर हे विद्यार्थ्यांना दमदाटी करतात. त्यांच्याकडे समस्या मांडल्या तर दडपशाही करतात. त्यांच्या त्रासाला विद्यार्थी वैतागले आहेत. त्यामुळे गृहपालांची बदली करावी, विद्यार्थ्यांना मंजूर क्षमतेइतकी शासकीय इमारत उपलब्ध करून द्यावी, कॉट, कॉम्प्यूटर, लॅब, अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी, शुद्ध पाणी, तसेच चांगल्या भोजनाची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी २० सप्टेंबर २०१७ रोजी आदिवासी आयुक्त (नाशिक), राजूर प्रकल्प कार्यालय, तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. परंतु त्याची कोणतीही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. २) वसतिगृहात ‘अन्न त्याग’ उपोषण सुरू केले. मागण्या मान्य होईपर्यंत भोजन न करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.