प्रशासनाच्या हट्टामुळे शिर्डीतील नॉन कोविड सेवा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:31+5:302021-09-14T04:25:31+5:30
शिर्डी : गोरगरिबांसाठी आधार असलेली साई संस्थान रूग्णालयातील नॉन कोविड सेवा प्रशासनाच्या हट्टामुळे धोक्यात आली आहे़ दोन्ही रूग्णालयाऐवजी ...

प्रशासनाच्या हट्टामुळे शिर्डीतील नॉन कोविड सेवा धोक्यात
शिर्डी : गोरगरिबांसाठी आधार असलेली साई संस्थान रूग्णालयातील नॉन कोविड सेवा प्रशासनाच्या हट्टामुळे धोक्यात आली आहे़ दोन्ही रूग्णालयाऐवजी पूर्वीप्रमाणे कोविड रूग्णांवर स्वतंत्र इमारतीत उपचार करणे आवश्यक झाले आहे़
सध्या साईबाबा रूग्णालयात कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या साईनाथ रूग्णालयात ही सेवा सुरू होणार आहे. वास्तविक ही रूग्णालये नॉन कोविडच्या विविध उपचारासाठी अत्यावश्यक आहेत. साईबाबा रूग्णालयात ट्रॉमा युनिट, हृदयशस्त्रक्रिया सारख्या तातडीच्या रूग्णांसह अतिदक्षता विभाग, डायलेसिस, विविध शस्त्रक्रिया, दंतरोग विभाग यांचा समावेश आहे़ तर साईनाथ रूग्णालयात प्रसुती, सिझेरीयन, डोळे, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील उपचार, बालरोग, होमिओपॅथी तसेच आयुर्वेदिक विभाग आहेत.
सध्या साईबाबा रूग्णालयात जवळपास ९० कोविड रूग्ण ॲडमिट आहेत. त्यामुळे या रूग्णालयात कोविड पेशंट व त्यांच्या नातेवाईकांचा सर्रास वावर सुरू आहे. यामुळे रूग्णालयातील कर्मचारी वर्ग मानसिक दबाव व भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. त्यातच या रूग्णालयात अन्य रूग्ण ही आहेत. मुळातच रूग्णावस्थेत प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. यामुळे या रूग्णांनाही कोविडची बाधा तत्काळ होऊ शकते. दोन्ही रूग्णालये शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने कोविड रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून संसर्ग पसरण्याची भीतीही कायम आहे़
कोविड रूग्णांसाठी अत्यावश्यक व तातडीच्या रूग्णांच्या जागा अडकून पडल्या आहेत. केवळ शक्यता गृहीत धरून वास्तवाकडे पाठ फिरवली जात आहे़
..........
अपघात विभाग नाही
नगर-मनमाड महामार्गावर रोज अपघात होत आहेत. हे अपघातग्रस्त रुग्ण स्वस्तातील व उत्तम उपचारासाठी शिर्डीला येतात. तसेच जवळपासच्या रुग्णालयांमध्ये अपघात विभाग नाही. हृदयविकाराचे उपचार जवळपासच्या शहरात गरिबांच्या आवाक्यातील नाहीत. त्यामुळे साई संस्थांनच्या रुग्णालयांकडे रुग्णांचा ओढा असतो. मात्र, नॉन कोविड सेवा बंद ठेवून कोविड सेवा सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा अट्टाहास अनेकांच्या जीवावर बेतू शकतो, असे अनेक रुग्णांचे म्हणणे आहे.
...........
साई आश्रममध्ये होऊ शकते कोविड रुग्णालय
साई संस्थानच्या साई आश्रममध्ये पूर्वीप्रमाणे कोविड रूग्णालय सुरू करायला हवे. सध्या ऑक्सिजन सिलिंडरची मुबलक उपलब्धता आहे. खूपच मोठी लाट आली तर एका दिवसात संस्थानच्या एका रूग्णालयातील ऑक्सिजनची व्यवस्था असलेला विभाग सुरू करणेही सहज शक्य आहे़ संस्थानच्या आहे त्याच रूग्णालयात कोविड सेवा सुरू ठेवण्याचा हट्ट सोडून कोविडच्या रूग्णांना चांगली सेवा कशी मिळेल व नॉन कोविड सेवाही बाधित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे़