दोन्ही महामार्गांना केंद्राचा निधी श्रेयासाठी कोणीही धडपडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:03+5:302021-07-11T04:16:03+5:30

कर्जत : अहमदनगर-टेंभुर्णी व जामखेड-श्रीगोंदा या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची कामे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत. या कामांचे श्रेय घेण्यासाठी इतरांनी ...

No one should struggle for central funding on both the highways | दोन्ही महामार्गांना केंद्राचा निधी श्रेयासाठी कोणीही धडपडू नये

दोन्ही महामार्गांना केंद्राचा निधी श्रेयासाठी कोणीही धडपडू नये

कर्जत : अहमदनगर-टेंभुर्णी व जामखेड-श्रीगोंदा या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची कामे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत. या कामांचे श्रेय घेण्यासाठी इतरांनी धडपड करू नये, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता केली.

राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी कर्जत येथील पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ते बाेलत होते.

विखे म्हणाले, अहमदनगर-टेंभुर्णी व जामखेड-श्रीगोंदा या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले आहे. हे दोन्ही रस्ते फोर लेनचे (चार पदरी) होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील ही कामे आहेत. यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा प्रकल्प भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने मंजूर केला आहे. राज्य सरकारची एक दमडीही या कामासाठी नाही. हे कटू सत्य असतानाही काही विद्वान मंडळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबाबरोबर कसले तरी निवेदन देतांनाचा फोटो काढतात आणि ही कामे मीच मंजूर करून आणली असा देखावा करत आहेत, अशी टीका विखे यांनी केली. लवकरच या दोन्ही कामांचा प्रारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते माहिजळगाव येथे होणार आहे, अशी घोषणा विखे यांनी केली.

याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दिवाण, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, गटविकास अधिकारी अमोल जाधव, भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, उपसरपंच पप्पू धोदाड, शेखर खरमरे आदी उपस्थित होते.

----

३७५ कोटींची नुकसान भरपाई

दोन्ही रस्त्यांसाठी जे क्षेत्र संपादित करण्यात येणार आहेत. नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना ३५७ कोटी रूपयांचे वाटप करण्यात येणार आहे. यापैकी २२२ कोटी रुपये प्रांत अधिकारी कार्यालयाकडे जमा केलेले आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत मोबदला वाटप करण्यात येणार आहे. मिरजगाव व माहिजळगाव येथे बायपास रस्ते होणार आहेत.

----

प्रांताधिकाऱ्यांबाबत तक्रारी...

अहमदनगर-टेंभुर्णी व श्रीगोंदा-जामखेड या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींची शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात प्रांताधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत वकील बाळासाहेब शिंदे व दादासाहेब सोनमाळी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी विखेंकडे तक्रारी केल्या. त्यावर येत्या पंधरा दिवसात सर्व नोटिसा काढून प्रक्रिया पूर्ण करू, असे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी स्पष्ट केले.

---

१० कर्जत विखे

कर्जत येथील बैठकीत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे. समवेत प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, गटविकास अधिकारी अमोल जाधव.

Web Title: No one should struggle for central funding on both the highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.