कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा कोणीच देईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:56+5:302021-04-30T04:25:56+5:30
जिल्हा रुग्णालयात पाचशे जणांनी प्लाझ्मासाठी नोंदणी केली आहे. मात्र प्लाझ्मा दानासाठी बरे झालेल्या रुग्णांचा प्रतिसाद कमी मिळतो आहे. ...

कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा कोणीच देईना
जिल्हा रुग्णालयात पाचशे जणांनी प्लाझ्मासाठी नोंदणी केली आहे. मात्र प्लाझ्मा दानासाठी बरे झालेल्या रुग्णांचा प्रतिसाद कमी मिळतो आहे. आतापर्यंत चारशे ते पाचशे जणांनी प्लाझ्माची गरज असल्याबाबत रक्तपेढीला फोन आले आहेत. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी सोमय्या खान यांनी केले आहे. जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सुशांत पारनेरकर म्हणाले, एप्रिल महिन्यात १२१ जणांनी मागणी केली. त्यापैकी सर्वांना प्लाझ्मा देणे शक्य झाले. आणखी रुग्णांनी पुढे यावे.
--------
प्लाझ्मा म्हणजे काय
रक्त प्लाझ्मा हा रक्ताचा एक पिवळसर द्रव घटक आहे. हा रक्ताचा द्रव भाग आहे, ज्यामध्ये माणसाच्या जीवनासाठी आवश्यक घटकद्रव्ये, पेशी आणि प्रथिने असतात. हे शरीरात रक्ताच्या प्रमाणात सुमारे ५५ टक्के असते.
----
प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय-
कोरोनातून व्याधीमुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा किंवा रक्त द्रव कोरोनाबाधित गंभीर रुग्णाला देण्याच्या प्रकियेला प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात. प्लाझ्मा दानाची प्रकिया रक्तदाना इतकीच सोपी असते. ती ९० मिनिटात पूर्ण होते. काढलेल्या रक्तातून फक्त प्लाझ्मा वेगळा करून घेतला जातो आणि लाल रक्तपेशी दात्याच्या शरीरात परत पाठवल्या जातात.
--------
कोण करू शकते प्लाझ्मा दान
कोरोना व्याधीतून पूर्णतः बरी झालेली व्यक्ती, डिस्चार्ज किंवा होम क्वारंटाइन नंतर २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकते. वय १८ ते ६० असावे. वजन ५० किलो पेक्षा जास्त असावे. संसर्ग झाल्यापासून चार महिन्यापर्यंत प्लाझ्मा दान करू शकते. (पहिले १४ २८ दिवस सोडून). दर १५ दिवसांनी कोरोनातून बरी झालेली व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करू शकते. प्लाझ्मा दानामुळे शरीरावर कुठले दुष्परिणाम होत नाही. दान केलेला ४०० ते ५०० मिली प्लाझ्मा, शरीर काही तासात पुन्हा बनवते. याचा शरीर स्वास्थ्यावर काहीही परिणाम होत नाही. थायरॉईड, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती देखील रक्तपेढीतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करू शकतात. शरीरातील रक्त काढल्यानंतर केवळ प्लाझ्मा वेगळा काढून घेतला जातो. लाल रक्त पेशी पुन्हा शरीरात
सोडल्या जातात. साधारणपणे ४०० मिली प्लाझ्मा काढून घेतला जातो. एका पेशंटला एका वेळी २०० मिली याप्रमाणे वापरला जातो. म्हणजेच एका प्लाझ्मा दानातून दोन रुग्णांचे जीव वाचवले जाऊ शकतात.
------------
कोविड होऊन बरे झालेल्या व्यक्तींच्या प्लाझ्मा मध्ये कोविड प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज असतात. प्लाझ्मा दान केल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होत नाही, कारण शरीर जलद गतीने पुन्हा प्लाझ्मा तयार करते. आपण एका वेळी केलेल्या प्लाझ्मा दानामुळे दोन जणांचे प्राण वाचू शकतात. कोविडशी झगडत असलेल्या रुग्णांना आपल्या प्रतिकार शक्तीची मदत करण्यासाठी बरे झालेल्या रुग्णांनी पुढे यावे.
- डॉ. सुचित गांधी, संगमनेर
---------
हेही पाहावे लागते
रक्तामध्ये सहाशेच्या पुढे अँटीबॉडी असाव्यात
रक्त परत पाठविण्यासाठी व्हेन सुस्थितीत असावी
हिमोग्लोबिन चांगले असावे
आरबीसी या कमी किंवा जास्त नकोत
---
फाईल फोटो वापरावा