अहमदनगर: अपघात अथवा पोलीस कारवाईची भीती न बाळगता बहुतांशी जण वाहन चालविताना सर्रास मोबाईलवर बोलताना दिसत आहेत. बहुतांश अपघातांचे कारण मोबाईलवर बोलणे असल्याचे समोर आले आहे.वाहतूक शाखेने वर्षभरात ३ हजार ५९१ जणांवर कारवाई करत ७ लाख १४ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडात्मक कारवाई होत असली तरी अनेकांची ही सवय जाता जात नाही. शहरात गर्दीच्या ठिकाणी, रस्ता क्रॉस करताने ते महामार्गावरून जातानाही अनेक दुचाकी, कारचालक अथवा मोठे वाहन चालविणारे मोबाईलचा उपयोग करताना दिसतात. मोबाईलवर बोलण्याच्या नादात बहुतांशी वेळा समोर येणारे अथवा दोन्ही बाजुने येणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष होते. यातून अनेकवेळा छोटोमोठे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. वाहन चालवितना वाहतुकीचे नियम पाळावेत, मोबाईलवर बोलणे टाळावे असे प्रबोधनात्मक फलक ररस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी लावलेले आहेत. मात्र बहुतांशी जण या सूचना फलकाकडे दुर्लक्ष करताना दिसतात तसेच पोलीस कारवाईलाही जुमानत नाही. मात्र रस्त्यावर स्वत:तसह इतरांच्या जिविताच्या सुरक्षिततेसाठी आता नागरिकांनीच जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
वर्षभरात वाहन चालविताना मोबाईलवर
बोलणाऱ्या ३५९१ जणांवर कारवाई
दंडाची रक्कम २०० रुपये
वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळून आले तर २०० रुपय दंडाची तरतूद आहे. शहर वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर अशी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच जिल्हाभरातही पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
सुरक्षित प्रवासासाठी तसेच स्वत:सह इतरांच्याही जिविताला धोका होऊ नये, यासाठी नागरिकांनी कोणतेही वाहन चाचलविताना मोबाईलचा वापर करू नये, खूपच महत्त्वाचे बोलायचे असेल तर बाजूला वाहन थांबून बोलावे. वाहन चालविताना नगर शहरात मोबाईलवर बोलताना आढळून येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.
- विकास देवरे, पोलीस निरीक्षक, नगर शहर वाहतूक