ऊसाच्या फडात कोरोनाला नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:16+5:302021-05-04T04:10:16+5:30
मच्छिंद्र देशमुख कोतूळ : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. मात्र, अकोले तालुक्यात अगस्ती कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आलेले आठ हजार ...

ऊसाच्या फडात कोरोनाला नो एन्ट्री
मच्छिंद्र देशमुख
कोतूळ : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. मात्र, अकोले तालुक्यात अगस्ती कारखान्यावर ऊस तोडणीसाठी आलेले आठ हजार कामगार व त्यांच्या कुटुंबात सहा महिन्यांत एकही कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला नाही.
कोतूळ येथे ५० कुटुंबांत मिळून १५० लोक ऊस तोडणीसाठी सहा महिन्यांपासून राहतात. कोतूळात कोरोनाने एका महिन्यात बारा लोकांचा बळी घेतला. मात्र, याच गावात सहा महिने राहणाऱ्या ऊस तोडणी कामगारांपैकी एकही बाधित नाही.
अगस्तीच्या कोतूळ, अकोले, इंदोरी, कळस, देवठाण, टाकळी, उंचखडक, सुगाव या सर्व ठिकाणी सहा हजार कामगार व कुटुंबातील लहान मुले वृद्ध असे आठ हजार लोक ऊस तोडणी व वाहतूक काम करतात. सहा महिन्यांत ऊस तोडणी कामगारांत एकही बाधित निघाला नाही, असे कोतूळ येथील ऊस तोडणी कामगार रावसाहेब चरणदास पवार, राहुल कैलास चव्हाण, ईश्वर सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
अगस्तीसह सर्वच कारखाने कोरोनामुळे कामगार टिकतील का, या विवंचनेत होते. अगस्तीने ऊस वाहतूक व तोडणी कामगारांना सहा हजार मास्क, सॅनिटायझर दिले. तसेच लोकसंपर्क येऊ नये म्हणून राहण्याच्या अड्ड्यावर स्थानिक किराणा दुकानदारांना, तर कारखाना स्थळावर कामगारांना दुकाने काढण्याची परवानगी दिली. तर इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून प्रत्येक अड्ड्यावर एक कर्मचारी ऑक्सिमीटरसह ठेवला. अगस्तीने नेमलेल्या डाॅक्टरमार्फत वेळोवेळी तपासणी व औषधोपचाराची सोय केली.
तसेच कारखाना व तोडणी अड्ड्यावर इतर लोकांना प्रवेशबंदी केल्याने येथे कोरोना आलाच नाही.
..........
तोडणी कामगार व वाहतूक यंत्रणेतील लोकांशी इतरांचा संपर्क येऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक, सॅनिटायझर, मास्क, आरोग्य तपासणी, औषधोपचार, कोरोनाबाबत जागृती केली जात होती. रोज कारखान्याचे अध्यक्ष मधुकरराव पिचड व संचालक मंडळ याबाबत सूचना करत होते. त्यामुळे अगस्तीत एकाही ऊस तोडणी कामगाराला कोरोनाची बाधा झाली नाही.
- भास्कर घुले, कार्यकारी संचालक, अगस्ती.
............
सुरुवातीला कोरोनामुळे कामगार येतात की नाही या धाकधुकीत आम्ही होतो. अध्यक्षांसह सर्व संचालक व प्रशासनाने दर आठवड्याला कामगार आरोग्याचा आढावा घेतला. आम्ही तोडणी कामगारांना स्वतंत्र कोविड केअरची व्यवस्था केली होती. मात्र, काळजी घेतल्याने एकही रुग्ण निघाला नाही.
-सिताराम गायकर, उपाध्यक्ष अगस्ती.
........
आम्ही दिवसभर काबाडकष्ट करतो. विहीर, नदी, नळ अशा विविध ठिकाणचे पाणी, ऊन अशा वातावरणात काम करतो. कोणताही आजार रेटण्याची शरीराला सवय झाली. यंदा अगस्तीने आमची खूप काळजी घेतली. त्यामुळे कोरोना ऊसाच्या फडात आलाच नाही.
-रावसाहेब चरणदास पवार, ऊस तोडणी कामगार, अगस्ती