नितीन औताडे गोळीबारात गंभीर
By Admin | Updated: June 29, 2014 00:30 IST2014-06-28T23:54:25+5:302014-06-29T00:30:19+5:30
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे औताडे आणि रोहमारे या दोन गटात शुक्रवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीत बंदुकीची गोळी लागून स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते नितीन औताडे गंभीर जखमी झाले.
नितीन औताडे गोळीबारात गंभीर
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे औताडे आणि रोहमारे या दोन गटात शुक्रवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीत बंदुकीची गोळी लागून स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते नितीन औताडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ हाणामारीत लाठ्या, काठ्या, गज, तलवारीचाही वापर करण्यात आला़ या घटनेत नऊ जण जखमी झाले असून, शिर्डी पोलिसांत नऊ जणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
मजुरांना धमकावण्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असली तरी, राजकीय द्वेशातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते़ स्वाभिमानीचे नितीन औताडे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे यांच्यात वितुष्ट असल्याने दोघेही एकमेकांच्या ताब्यात असलेल्या संस्थांबाबत तक्रारी करीत असतात़ पोहेगावमध्ये असलेले राजकीय भांडण आता हाणामाऱ्यावर आले आहे़
शिर्डी पोलीस ठाण्यात घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुरेश गंगाधर औटी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोहेगाव येथे खंडोबा मंदिरासमोर माजी आमदार दादा शहाजी रोहमारे विविध कार्यकारी सोसायटी नं़ २ अंतर्गत बांधकाम सुरू आहे़ दि़ २७ जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास या बांधकामावरील मजुरांना धमकाविण्याच्या कारणावरून नितीन औताडे, रवी औताडे, अमोल औताडे, सुनील औताडे, प्रमोद औताडे व जयंत रोहमारे, सचिन रोहमारे, राजू रोहमारे, आण्णा रोहमारे, शुभम रोहमारे यांनी आपसात लाठ्या, काठ्या, गज यांच्यासह दंगा करून, आपसात हाणामारी करून दगडफेक करून एकमेकांना जखमी केले़ यावेळी जयंत रोहमारे यांनी स्वसंरक्षणार्थ पिस्तुलातून तीन वेळा हवेत गोळीबार केला़
या हाणामारीत जखमी झालेले नितीन औताडे, अमोल औताडे यांना नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे़ तेथे अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक धनवटे यांनी जखमींचे जबाब घेतले़ नितीन औताडे यांच्या उजव्या पायाला पिस्तुलाची गोळी लागली व डोक्यात तलवारीचे वार आहेत. अमोल यांच्या डोक्यात दंडुका मारण्यात आलेला असल्याचे धनवटे यांनी सांगितले़
पोहेगाव बंद, तणाव कायम
हाणामारीच्या घटनेनंतर पोहेगावात तणावाचे वातावरण आहे़ घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ दरम्यान शनिवारी दिवसभर पोहेगावमध्ये बंद पाळण्यात आला़