शेवगाव-पाथर्डींसह ५४ गावांमध्ये निर्जळी
By Admin | Updated: June 8, 2014 00:36 IST2014-06-07T23:47:50+5:302014-06-08T00:36:22+5:30
शेवगाव : वादळी पावसामुळे विजेचे खांब वाकल्याने शेवगाव-पाथर्डीसह ५४ गावांची पाणी वितरण व्यवस्था गेल्या चार दिवसांपासून कोलमडली आहे.
शेवगाव-पाथर्डींसह ५४ गावांमध्ये निर्जळी
शेवगाव : वादळी पावसामुळे विजेचे खांब वाकल्याने शेवगाव-पाथर्डीसह ५४ गावांची पाणी वितरण व्यवस्था गेल्या चार दिवसांपासून कोलमडली आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी दोन्ही तालुक्यातील सुमारे अडीच लाख जनतेला पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
वित्त हानी
शेवगावसह तालुक्यातील सुमारे वीस ते पंचवीस गावांना मंगळवार, बुधवार व गुरुवार असे सलग तीन दिवस वादळी पावसाने झोडपले. पाऊस कमी मात्र वादळी वारे मोठ्या प्रमाणावर असल्याने हजारो शेतकऱ्यांच्या फळबागांसह अनेकांच्या घरावरील तसेच शेतीवस्तीवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक वित्तहानी झाली. तालुक्यातील माळगांवने येथील बावीस वर्षीय तरुण शेतकरी वीज पडून मृत्युमुखी पडला. तर ढोरजळगाव-ने येथील एका शेतकऱ्याच्या पशुधनाची हानी झाली.
पाच दिवसांपासून टंचाई
शेवगाव येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात पाणी न सुटल्याने शेवगावकरांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. वीज पुरवठ्यातील सावळा गोंधळाची परिस्थिती लक्षात घेऊन शेवगाव ग्रामपंचायत प्रशासनाने ‘महावितरण’च्या मदतीने वाकलेले वीज खांब तातडीने दुरुस्त करुन वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामास काही प्रमाणात यश आल्याने शनिवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होण्यास यश मिळाले, असे ‘महावितरण’ चे सहाय्यक अभियंता सतीश शिंपी, शेवगावचे उपसरपंच एजाज काझी, हरिश भारदे यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील वादळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्याचे आमदार चंद्रशेखर घुले यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)
वीज खांब वाकले
शेवगाव- पाथर्डीसह सुमारे ५४ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु असलेल्या दहिफळ येथील जॅकवेल परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने तसेच सुमारे दहा ते बारा वीज खांब वाकल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून शेवगाव शहर, दादेगाव, खुंटेफळ, तळणी, दहिफळ, घोटणसह लाभार्थी ५४ गावातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
वीस टँकरने पाणी पुरवठा
शेवगावसह तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची तीव्रता कायम आहे. वीस गावे व सत्तर वाड्या-वस्त्यांना सध्या वीस टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आल्यानंतर तालुक्यातील लाडजळगाव, जोहरापूर, बक्तरपूर, भातकुडगाव, आव्हाणे, आखेगाव आदी गावांमध्ये टँकर सुरु करण्यात आले. तर वाडगाव, कोनोशी येथील टँकरच्या मागणीनुसार लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे तहसीलमधील सूत्राने सांगितले. शेवगाव येथे दिवसभरात नऊ ते दहा तास व ग्रामीण भागात बारा ते तेरा तासाच्या विक्रमी भारनियमनामुळे वीज पुरवठ्याची समस्या ऐरणीवर आली आहे. वीज पुरवठ्याअभावी पाणी वितरण व्यवस्थेत व्यत्यय येत आहे.