नऊ लाख रोपांना पावसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 22, 2014 00:20 IST2014-06-21T23:39:38+5:302014-06-22T00:20:39+5:30
अहमदनगर : वन विभागातील नऊ लाख रोपे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ जिल्ह्यातील वन क्षेत्रावर लागवड करण्यासाठी वन विभागाने ९ लाख रोपे तयार केले

नऊ लाख रोपांना पावसाची प्रतीक्षा
अहमदनगर : वन विभागातील नऊ लाख रोपे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ जिल्ह्यातील वन क्षेत्रावर लागवड करण्यासाठी वन विभागाने ९ लाख रोपे तयार केले असून, पुरेसा पाऊस न पडल्याने लागवड लांबणीवर पडली आहे़
वन विभागाच्या वतीने दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते़ त्यामुळे उन्हाळ्यात रोपवाटीकेत रोपे तयार केली जातात़ पुरेसा पाऊस पडताच रोपांची लागवड वनक्षेत्र परिसरात करण्यात येते़ जिल्ह्यातील कोपरगाव, राहुरी, नगर, पाथर्डी, पारनेर, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील ४२९ गावांत वन क्षेत्र आहे़ वन विभागाच्या आहवालानुसार ८२ हजार २६६ हेक्टर जमिन या विभागाच्या ताब्यात आहे़ यंदा वन विभागाने ८६२ हेक्टरवर रोपे लावण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन ९ लाख ४० हजार रोपे तयार केली आहेत़ रोप वाटीकेत रोपेतयार आहेत़ मात्र पुरेसा पाऊस पडला नाही़ त्यामुळे ही रोपे रोपवाटिकेत पडून असून, रोपेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़
शहरासह जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही़ त्यामुळे पेरणीची कामे रखडली आहेत़ शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे लागले आहेत़ पाऊस नसल्याने वन विभागानेही सावध पवित्रा घेतला आहे़ रोपे तयार केली़ पण पुरेसा पाऊस पडल्यानंतर त्यांच्याकडून लागवड होणार आहे़ रोपे लावण्यासाठी जिल्ह्यातील ३४ गावांची निवड करण्यात आली आहे़ संयुक्त समितीच्या सहकार्याने ही रोपे लावली जाणार आहेत़ पण पाऊस न पडल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रमही पुढे ढकलला असून, पुरेसा पाऊस पडल्यानंतरच निवडलेल्या गावांना रोपांचे वाटप केले जाणार असल्याचे वन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे़
(प्रतिनिधी)
यंदा ८६२ हेक्टरवर ९ लाख ४० रोपे लावण्याचे वन विभागाचे उद्दिष्ट आहे़ रोप वाटीकेत रोपे तयार करण्यात आली आहेत़ पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही़ त्यामुळे वृक्ष लागवडीचे काम हाती घेण्यात आले नाही़
-सहाय्यक वनरक्षक,
वनविभाग
वन क्षेत्रातील रोपांचे संरक्षण करण्यासाठी २२४ संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे़ या समित्यांमार्फत वृक्षांची देखभाल करण्यात येत असून, बहुतांश समित्यांचे काम कौतुकास्पद आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष जगविली जात आहे
यंदा ९ लाख ४० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ ही रोपे तयार करण्यात आली आहेत़ रोपे तयार करण्यासाठी प्रत्येकी सरासरी सहा रुपये खर्च आला असल्याचे सांगण्यात आले़